पहिल्या टप्प्यात रंगभरण स्पर्धा उत्साहात..
सावंतवाडी,दि.२५: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित ‘लर्न अँड ग्रो’ या शृंखले अंतर्गत लहान मुलांसाठी आयोजित रंगभरण स्पर्धा आज मोठ्या उत्साहात पार पडली. ज्युनिअर व सिनिअर केजी, पहिली व दुसरी आणि तिसरी व चौथी अशा तीन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेला मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, परीक्षक बी.बी.शिरोडकर व मुख्याध्यापिका प्रियांका डिसोझा उपस्थित होत्या.
स्पर्धेच्या सुरुवातीलाच विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत नियमावली स्पष्ट करण्यात आली. त्यानंतर मुलांना गटनिहाय चित्रांचे वाटप करण्यात आले. पहिल्या दोन गटांसाठी दिलेले चित्र रंगवणे आणि तिसऱ्या गटासाठी चित्र काढून रंगवणे असे स्वरूप होते. रंगीत खडू, पेस्टल कलर्स, वॉटर कलर्स अशा विविध माध्यमातून मुलांनी चित्रे रंगवली. सहभागी मुलांच्या पालकांसाठी ठिपक्यांच्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक पालक उत्साहाने सहभागी झाले. परीक्षक म्हणून बी.एस.बांदेकर फाईन आर्टस् कॉलेजचे प्रा.बी.बी.शिरोडकर उपस्थित होते.
सर्व चित्रांचे परीक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांद्वारे विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येतील असे सांगण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यानिमित्ताने शाळेचे कलाशिक्षक गजानन पोपकर यांनी रंगवलेल्या स्टोन पेंटिंग कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी YBIS च्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.