संबंधित विभाग सुशेगाद; तात्काळ खड्डा बुजवा.. प्रवाशांसह नागरिकांची मागणी
सावंतवाडी,दि.१५: कारिवडे येथे सावंतवाडी शहराच्या प्रवेशद्वारावर आंबोली सावंतवाडी राज्य मार्गावर भले मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. अनेक दिवस हा खड्डा तसाच असून बांधकाम विभाग मात्र सुशेगाद आहे. याबाबतची तक्रार प्रवाशांनी केल्यानंतर त्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फक्त धोकादायक म्हणून फलक लावण्यात आला आहे. मात्र खड्डा बुजवण्यासाठी काही केले नाही. त्यामुळे प्रवाशांची नाराजी आहे.
सावंतवाडी कारिवडे येथील कचरा डेपोच्या समोर काही अंतरावर आणि शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा भला मोठा खड्डा आहे. त्या ठिकाणी मोरी खचल्यामुळे हा खड्डा पडला आहे. मात्र गेले आठवडाभर तो खड्डा तसाच आहे. तक्रार केल्यानंतर बांधकाम विभागाकडून त्या ठिकाणी धोकादायक म्हणून फलक लावण्यात आला. मात्र गेले काही दिवस तो खड्डा तसाच आहे. खड्डयाची लांबी लक्षात घेता दुचाकीचे चाक थेट खड्डयात जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तो तात्काळ बुजवावा,अशी मागणी होत आहे.