आंबेडकर अनुयायींचा सावंतवाडीत मोर्चा
सावंतवाडी,दि.२४: ज्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशात संविधानाद्वारा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी जीवाचे रान केले, त्याच बाबासाहेबांचा केला जाणार अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही. वारंवार केला जाणारा संविधानाचा आणि बाबासाहेबांचा अवमान म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीचा अवमान आहे, असा सूर संविधान सन्मान कृती समितीच्या निषेध मोर्चात मान्यवरांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथे मंगळवारी संविधान सन्मान कृती समितीतर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भर संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या विधानाचे आंबेडकरी अनुयायांनी जोरदार निषेध व्यक्त करत प्रत्युत्तर दिले. ‘मुर्दाबाद मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद!’, ‘या संविधान विरोधी शासनाचे करायचे काय? खाली डोके वरती पाय.!’, ‘निषेध असो निषेध असो, बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्यांचा निषेध असो!’ आणि ‘बाबासाहेबांचा विजय असो, संविधानाचा जयजयकार असो!’ अशा जोरदार घोषणाबाजींनी सावंतवाडीचा मोती तलाव परिसर आणि मुख्य बाजारपेठ परिसर दुमदुमन निघाला.
सावंतवाडी येथील समाज मंदिर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून निषेध मोर्चाची सुरुवात झाली. यावेळी डॉ. रुपेश पाटकर, डॉ. प्रसाद फातर्पेकर, ॲड. संदीप निंबाळकर, ॲड. सुरेश मिसाळ, ॲड. एस. व्ही. कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, भारत मुक्ती मोर्चाचे ॲड. सगुण जाधव, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, पी. एल. कदम, प्रकाश नेरुरकर, मिलिंद नेमळेकर, पॉली परेरा, भावना कदम, लाडू जाधव, नारायण आरोंदेकर, वासुदेव जाधव, सत्वशीला बोर्डे, श्री. बागवान, ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांसह तमाम आंबेडकरी अनुयायी संविधान प्रेमी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे तमाम नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, समाज मंदिर येथून निघलेला निषेध मोर्चा मोती तलावाच्या काठाकडून पुढे सावंतवाडी बाजारपेठेतून जोरदार घोषणाबाजी देत निघाला. शेवटी या मोर्चाचा समारोप गांधी चौक येथे आयोजित सभेत करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतांतून बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अवमान करणाऱ्यांचा जोरदार निषेध व्यक्त केला.
यावेळी उपस्थित ॲड. एस. व्ही. कांबळे यांनी या समारोप मोर्चाचे प्रास्ताविक सादर करताना सांगितले की, देशात चाललेल्या संविधान विरोधी घटना तसेच वारंवार होणारा बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अवमान हा लोकशाही विरोधी शासनाची हुकूमशाहीकडे होणारी वाटचाल दर्शविणारा आहे.
यानंतर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले हा लढा ज्ञानी विरुद्ध अज्ञानीचा आहे. मसल आणि मनी पॉवरवर निवडून आलेले बाबासाहेब आणि संविधानावर नको नको ते बोलतात. यावरून त्यांची कीव करावीशी वाटते. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फॅशन म्हणून बाळगायची गोष्ट नाही हा समतेचा विचार असून सामान्य जनतेला आपले जीवन जगता यावे यासाठी असलेला एक सनिधानिक अधिकार आहे.
ॲड. संदीप निंबाळकर म्हणाले गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला अवमान केवळ आंबेडकरांचा नाही, तर तो बाबासाहेबांना मानणाऱ्या साऱ्यांचाच आहे. आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळचेपी करणारा कायदा आता होऊ घातला आहे. ‘जन सुरक्षा’ नावाचा महाभयंकर कायदा आणण्याचं मोठं षडयंत्र या शासनाचे सुरू आहे. ज्यामुळे सामान्य नागरिकांचा आवाज आणि त्याचे हक्क हिरावून घेतले जाणार आहेत. त्यामुळे आगामी काळात याचे भान ओळखून प्रत्येकाने या कायद्याचा निषेध करणे व्यक्त करणे काळाची गरज आहे.
यावेळी उपस्थित असलेल्या सत्वशीला बोर्डे या आंबेडकरी वाघिणीने जोरदार डरकाळी फोडत वेळप्रसंगी आम्ही हातात तलवारी घेऊन झाशीच्या राणीसारख्या या निष्ठुर राज्यकर्त्यांविरुद्ध लढा पुकारू, असा एक प्रकारे इशारा दिला. त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही आता अबला नाही तर सबला आहोत. आम्ही सावित्रीच्या आणि रमाईच्या लेकी आहोत. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांसारखा शिवबा घडविण्याची ताकद आमच्यात आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यकर्त्यांनी आपले वक्तव्य करताना हजार वेळा विचार करावा, असेही सत्वशीला बोर्डे म्हणाल्या.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर म्हणाले, बाबासाहेबांवर बोलण्याची लायकी नसणाऱ्या अमित शहा यांनी लवकरात लवकर स्वर्गात जावे. जेणेकरून एक नवीन व्यक्ती जो संविधानाचा पाईक आहे, बाबासाहेबांच्या विचारांचा सन्मान करणारा आहे. तो सत्तेत येईल, असे सांगत अमित शहा आणि भाजपाच्या विविध ध्येय धोरणांवर कडाडून टीका केली.
या निषेध मोर्चात सहभागी झालेले वासुदेव जाधव, नारायण आरोंदेकर, सगुण जाधव, श्री. बागवान यांनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त करून संविधान विरोधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमान करणाऱ्यांच्या विरोधात जोरदार वक्तव्य केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांनी केले.