सावंतवाडी,दि.१५: येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या चार विद्यार्थिनींना पदवी, पदव्युत्तर पदवी आणि उद्योजकता या तीन प्रकारांमध्ये भारत सरकारकडून रिसर्च स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये बी.फार्मसी अंतिम वर्षात शिकणाऱ्या नेहा चव्हाण व जान्हवी बगळे यांना रुपये तीस हजार तीन महिन्यांसाठी, एम.फार्मसी अभ्यासक्रम शिकणाऱ्या अमिता भालेकर हिला रुपये नव्वद हजार सहा महिन्यांसाठी आणि नुकतीच बी.फार्म पदवी उत्तीर्ण झालेल्या तेजस्वी कडू हिला उद्योजकता गटातून रुपये नव्वद हजार सहा महिन्यांसाठी व रुपये दोन लाख स्वतंत्र अनुदान जाहीर झाले आहे.
प्रधान वैज्ञानिक शाश्वत सल्लागार कार्यालय, पुणे क्लस्टर व बीएएसएफच्या सहयोगाने आरोग्य क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही रिसर्च स्कॉलरशिप देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांचे प्रेझेंटेंशन व मुलाखती पार पडल्यावर शासकीय समितीमार्फत पात्र विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात येतात. या प्रक्रियेनुसार भोसले फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
या संशोधनासाठी त्यांना कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजय जगताप, फार्मास्युटीक्स विभागप्रमुख डॉ. रोहन बारसे, फार्मास्युटिकल केमिस्ट्री विभागप्रमुख डॉ.गौरव नाईक आणि फार्मास्युटीक्स विभागाचे सहाय्यक प्राध्यापक मयुरेश रेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ॲड .अस्मिता सावंतभोसले व सचिव संजीव देसाई यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.