सावंतवाडी,दि.१५: महाराष्ट्र शासन आणि जर्मनीतील बाडेन वाटेनबर्ग राज्य यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार जर्मन भाषा प्रशिक्षणार्थ्यांची पहिली तुकडी भोसले नॉलेज सिटी व बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था येथे प्रशिक्षण घेत आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना जर्मन नोकरीची नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या उपस्थितीत आज प्रदान करण्यात आली. याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर, प्रधान सचिव कुंदन, राहुल रेखावार संचालक, एसईआरटी, प्रांताधिकारी हेमंत निकम, भोसले नॉलेज सिटी कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, बॅरिस्टर नाथ शिक्षण संस्थेचे उमेश गाळवणकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख नीता कविटकर, प्रेमानंद देसाई, विनोद सावंत, नंदू शिरोडकर,सावंतवाडी शहर भाजप अध्यक्ष अजय गोंदावळे, जर्मन प्रकल्प समन्वयक श्री ओंकार कलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एकूण ९५ विद्यार्थ्यांना ही नियुक्तीपत्रे देण्यात आली. यामध्ये सावंतवाडी येथील ५६ व कुडाळ येथील ३९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या ९५ विद्यार्थ्यांमधून नर्सिंग साठी ३९ तर इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिशियन मेकॅनिकल ड्रायव्हर हॉटेल मॅनेजमेंट सिविल इंजिनिअर असे ५६ युवक युवती जर्मनी मध्ये रोजगारासाठी जाणार आहेत.
या युवक युवतींचे गेले चार महिन्यापासून जर्मनी भाषा प्रशिक्षण सुरू आहे.
दीपक केसरकर मंत्री महोदय गेले दहा महिने या प्रकल्पाचा पाठपुरावा करीत होते. साठी ते अनेक वेळा जर्मनीमध्ये जाऊन आले. सरकारशी बोलणे करून करारनामा केला. जर्मनीचे शिष्टमंडळ सुद्धा सिंधुदुर्ग मध्ये येऊन गेले होते.
काहीतरी जळगाव सिंधुदुर्ग मध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. जळगाव मधील २२ तरुण तरुणी यांना सुद्धा नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहेत. सिंधुदुर्ग मध्ये बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ आणि भोसले नॉलेज सिटी सावंतवाडी या संस्थांमध्ये संबंधित विद्यार्थ्यांना जर्मनी भाषेचे प्रशिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत मार्फत सुरू होते.
जर्मनी मध्ये फार मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातून चार लाख तरुण-तरुणींना जर्मनीला पाठवायचे आहे. त्यासाठीचे पहिले पाऊल आहे. सदर विद्यार्थ्यांना व्हिसा व इतर तांत्रिक खर्च संबंधित कंपन्यांमार्फत उपलब्ध करून दिला जाणार आहे. आज नियुक्तीपत्र दिलेली आहेत. मात्र जर्मन भाषेचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात हे तरुण-तरुणी जर्मनीला जाऊन नोकरी करणार आहेत.
उपस्थितांना ऑनलाईन संबोधित करताना केसरकर म्हणाले की जर्मनीमध्ये महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना रोजगार देण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सिंधुदुर्ग व जळगाव जिल्ह्यांमध्ये पथदर्शी तत्त्वावर सुरू करण्यात आला. जर्मन देशात भारतातील तंत्र कुशल मनुष्यबळाला प्रचंड मागणी आहे. महाराष्ट्रातील मनुष्यबळाचा विचार करता आपल्याकडे हुशार व मेहनती तरुणांची संख्या कमी नाही. या तरुणांना चांगल्या वातावरणात काम करण्याची संधी मिळावी तसेच चांगले अर्थार्जन करता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने हा करार केला होता. याच कराराअंतर्गत सावंतवाडी व कुडाळ येथे जर्मन प्रशिक्षण सुरू करण्यात आले. त्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना आज नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करताना मला खूप आनंद होत आहे. आज जरी ९५ विद्यार्थ्यांना नोकरी देऊ शकत असलो तरी भविष्यात हाच आकडा हजारो व लाखोंच्या संख्येत पोचण्यासाठी पहिली तुकडी सर्वांसाठी आदर्श उदाहरण ठरेल.
सूत्रसंचालन प्रभू यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रेमानंद देसाई यांनी केले.