सावंतवाडी,दि.२६: तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं.४ ही आयएसओ मानांकित सर्व भौतिक सुविधांनी युक्त असलेली तसेच अनेक दर्जेदार विद्यार्थी घडवून नावलौकिक प्राप्त असलेली, गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देणारी सावंतवाडी तालुक्यातील एक नावाजलेली शाळा आहे. प्रत्येक उपक्रम या शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक,पालक आणि शालेय व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने अत्यंत उत्साहाने राबविला जातो. चालू शैक्षणिक वर्षात या शाळेतील दोन विद्यार्थ्यांची निवड नवोदय विद्यालयासाठी झालेली आहे तसेच या शाळेची विद्यार्थिनी गणित प्रज्ञा परीक्षेत राज्यस्तर गोल्ड मेडलिस्ट आहे.
एक विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीत अकरावी आलेली आहे. पालकांच्या सहभागातून या शाळेच्या अनेक भौतिक सुविधा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. उच्चविद्याविभूषित शिक्षक या शाळेमध्ये कार्यरत आहेत. अनेक सामाजिक कार्यक्रम या शाळेमध्ये पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने दर्जेदारपणे राबविले जातात. स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची अंमलबजावणी तसेच विविध सांस्कृतिक स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन या शाळेमध्ये केले जाते.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ अभियान तालुकास्तरीय मूल्यमापन करताना या शाळेवर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आलेला आहे असा आरोप शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्ग यांच्याकडून करण्यात आला आहे.
सदर मूल्यमापन करत असताना मूल्यमापन प्रपत्रा वरील नोंदी या पेन्सिलने घेण्याचे कारण काय..? तसेच मूल्यमापन केल्यानंतर मिळालेले गुण याची कोणतीही नोंद शाळा स्तरावर का ठेवली जात नाही..? मूल्यमापन प्रपत्र हे मुद्दे निहाय स्पष्ट असताना गुपचूप गुपचूप लपवाछपवी केल्या प्रमाणे प्रशासनाचे वागणे हे संशयास्पद वाटते आहे. त्यामुळे सदर मूल्यमापन प्रक्रिया ही कोणाच्यातरी दबावाखाली, पूर्वग्रह दूषित राबविली जात आहे असा संशय येणे स्वाभाविक आहे त्यामुळे माहितीच्या अधिकाराखाली मूल्यमापन प्रपत्रे मिळविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक वर्ग हे विचार करत आहेत.
सावंतवाडी शहरात अनेक खाजगी शैक्षणिक संस्था आव्हाने देत असताना ती आव्हाने समर्थपणे पेलवून स्वतःचे दर्जेदार अस्तित्व टिकवून ठेवणारी ही शाळा आहे. या शाळेची पटसंख्या दिवसागणिक वाढतच आहे. असे असताना सदर शाळेचा येणारा नंबर डावलून शाळेवर प्रशासनाने जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे हा अन्याय दूर न झाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करून पुढील पाऊल उचलले जाईल असा इशारा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी दिला आहे.