भाजपा वेंगुर्ले आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक सन्मान सोहळा संपन्न
वेंगुर्ले,दि.०४: भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथील स्वामिनी मंडपम् येथे आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक सन्मान सोहळ्याला उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
या सन्मान सोहळ्याचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून कोकण पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, खर्डेकर महाविद्यालय प्राचार्य डॉ. एम.बी.चौगले, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व ॲड. सुषमा खानोलकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, माजी सभापती निलेश सामंत, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर व्यवसायाभिमुख शिक्षण पद्धती उपलब्ध झालेली आहे त्याचा फायदा भावी काळात रोजगार निर्मितीसाठी होणार आहे युवकांनी कौशल्यावर आधारीत शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे असे आवाहन आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी केले. यावेळी त्यांनी पुराणातील दाखला देत आई व वडील यांचे महत्त्व विषद केले.
माजी आमदार राजन तेली यांनी आपला जिल्हा शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अग्रेसर असला तरी स्पर्धा परीक्षांमध्ये मागे का आहे, याविषयी भाष्य करीत भविष्यात सिंधुदुर्ग मधून प्रशासकीय अधिकारी तयार होतील असा आशावाद व्यक्त केला, तर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
वेंगुर्ले तालुक्यामधील दहावी आणि बारावी मधील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी, पाचवी व आठवी मधील शिष्यवृत्तीधारक आणि वेंगुर्ला तालुक्यातील दहावी बारावीचा शंभर टक्के निकाल देणाऱ्या प्रशालांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र तर मुख्याध्यापक यांना सन्मानपत्र, भेटवस्तू आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला हायस्कूल च्या शिक्षिका विमल शिंगाडे यांचा स्वातंत्र्यवीर स्मृती आतंरराष्ट्रीय हिंदी गौरव सन्मान २०२४ मिळाल्याबद्दल भाजपा वेंगुर्ला यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी कोकण पदवीधर मतदार संघातून विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे यांचा वेंगुर्ला भाजपा च्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील विविध संस्थांनी डावखरे यांचा सन्मान करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, माजी सभापती सारीका काळसेकर, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, नगरसेवक प्रशांत आपटे, महीला मोर्चाच्या श्रेया मयेकर, वृंदा गवंडळकर, रसीका मठकर, आकांक्षा परब, मारुती दोडशानट्टी, समीर कुडाळकर, राजु सामंत, रफिक शेख, रविंद्र शिरसाठ, भुषण सारंग इत्यादी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन परूळकर यांनी तर आभार प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी मानले.