स्थानिक डीएड टीईटी, सीटीईटी पात्रताधारकांना सामावून न घेतल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार
कुडाळ,दि.३१: स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गच्यावतीने स्थानिक टीईटी, सीटीटी पात्र, अभियोग्यताधारक डीएड पदवीधारकांच्या हक्कासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे समोर मंगळवार दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लाक्षणिक धरणे आंदोलन केले जाणार आहे.
टीईटी अपात्र असणाऱ्या डीएड धारकांना जिल्हा परिषदेवरील कमी पटाच्या शाळांवर १५ हजार मानधनावर नियुक्ती देण्याबाबतची समाज माध्यमातील बातमी वाचनात आल्यानंतर त्या बातमीतील आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यातील २१५ उमेदवारांची यादी शासनाकडे दिल्याचे सांगितले. त्या यादीत टीईटी, सीटीटी पात्र, अभियोग्यताधारक डीएड पदवीधारकांची नावे आढळून आलेली नाहीत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश उमेदवार हे टीईटी, सीटीटी, अभियोग्यताधारक आहेत हे सदर आंदोलकांकडून जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आली त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात टीईटी, सीटीटी, अभियोग्यताधारक डीएड पदवीधारकच नाहीत असे चित्र सर्वांसमोर दाखविण्यात आले. यामुळे या नियुक्तीच्या वेळी पात्र उमेदवारांवर अन्याय होणार आहे. या अन्यायावर आवाज उठवण्यासाठी सदर आंदोलन करून शासनाकडे दाद मागितली जाणार आहे. शासनाने डावलून निर्णय घेतल्यास न्यायालयाचे दरवाजे ही ठोठावणार अशी तयारी समिती मार्फत जाहीर करण्यात आली आहे.
सदर आंदोलनास बहुसंख्येने टीईटी/सीटीईटी अभियोग्यताधारक डीएड पदवीधारकांनी व त्या २१५ यादीत समावेश नसलेले डीएड TET अपात्र उमेदवारांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष विनय गायकवाड यांनी केलेले आहे.