वेंगुर्ला येथे खासदर सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव.
वेंगुर्ला,दि.३० : कोकणातील विद्यार्थी प्रचंड बुद्धिमत्ता असलेले आहेत अलीकडे विद्यार्थी प्रचंड गुण मिळवतात. त्यांनी मिळालेले गुण पुढील आयुष्यासाठी त्यांना प्रेरणादायी ठरतात,मात्र फक्त एवढ्यावरच थांबू नये तर उच्च शिक्षण घेऊन सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनी आपला नावलौकिक मिळवावा आणि ज्या लाल मातीने आपल्याला प्रेम दिलं त्या लाल मातीतला विसरू नये. आपल्या मातीचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी कटिबद्ध असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कोकण महिला प्रदेशाध्यक्षा तथा अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब यांनी येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात व्यक्त केले.
संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेस व अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक तथा कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे यांच्या माध्यमातून येथील साई डीलक्स हॉल सुंदरभाटले येथे दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, माजी नगराध्यक्षा तथा महिला प्रदेश उपाध्यक्ष नम्रता कुबल, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा ॲड. रेवती राणे, तालुकाध्यक्ष योगेश कुबल, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, महिला तालुकाध्यक्षा दीपिका राणे, शहर कार्याध्यक्ष सुहास कोळसुलकर, सचिव स्वप्निल राऊळ, तालुका उपाध्यक्ष विशाल बागायतकर, परेश सारंग, तालुका कृषी सेल अध्यक्ष बाबा टेमकर, तालुका उपाध्यक्ष बबन पडवड, तुळस विभागीय अध्यक्ष अवधूत मराठे कुणाल बिडये, सौ आदिती चुडनाईक आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शालेय साहित्य वितरित करण्यात आले. दरम्यान अर्चना घारे पुढे म्हणाल्या की सावंतवाडी मतदारसंघातील शिक्षक, पालक व विद्यार्थी यांना काहीही अडचण असल्यास तसेच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन व इतर गोष्टींची आवश्यकता असल्यास कधीही अर्चना फाऊंडेशनशी संपर्क साधावा. आपणांस शक्य ती मदत करण्यासाठी आपण नेहमीच तयार आहोत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमास माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले अर्चना फाऊंडेशनच्या हा स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण करून नाव कमवावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यातील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.