येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडू – माजी उपसरपंच गुरुदास गवंडे
सावंतवाडी,दि.१७: इन्सुली येथून निगुडे गावात जाणारी मुख्य ग्रामीण नळपुरवठा योजनेचे मुख्य पाईप लाईन गेली तीन महिने फुटून लाखो लिटर पाणी मात्र वाया जात आहे वारंवार या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना देऊन देखील यावर कोणती उपाययोजना केलेली नाही.
नळ योजनेचा पंप सायंकाळी ०५ वा. ते सकाळी १०:०० वाजेपर्यंत चालू असतो. बारा ते चौदा तास पंप चालू केल्यानंतर पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पिण्याचे पाणी ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे वाहून जात आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासन पाईप लाईन दुरुस्ती करण्यास का दिरंगाई करत आहे?असा सवालही गवंडे यांनी उपस्थित केला. पाईपलाईन ही चार ठिकाणी फुटून हर घर घर जल असं असतानाही लाखो रुपये जलजीवन मिशन अंतर्गत खर्च करून लोकांना पुरेसं पिण्याचे पाणी मिळत नाही. यासंदर्भात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्या या दुर्लक्षामुळे विद्युत पंप आठ तासाऐवजी चौदा तास चालवावा लागत आहे. भविष्यात ग्रामपंचायत प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे विद्युत पुरवठ्याची बिले ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात आली की याचा त्रास नळपुरवठा धारकांना वाढीव बिले आकारुन गावातील नागरिकांना त्रास देण्याचे काम ग्रा.पं. प्रशासन करणार आहे.कारण यापूर्वी प्रती १००० लि. युनिट ०७ रु. होते. ते ०९ रु. करण्यात आलेले आहे. तसेच निगुडे सोनुर्ली मुख्य रस्ता दुरुस्ती करत असताना पाईपलाईन ही खूप खोल खाली राहिल्यामुळे ती संरक्षक भिंतीच्या बाजूने न घेतल्यास भविष्यात पाईपलाईन फुटली तर दुरुस्ती करणे अवघड होणार आहे. त्यामुळे त्यावर आत्ताच उपयोजना करणे गरजेचे आहे. जर पाईप लाईन येत्या आठ दिवसात दुरुस्ती न केल्यास योग्य ती उपाय योजना न झाल्यास आंदोलन छेडून ग्रामपंचायतीला जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशारा निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी दिला आहे.