एसव्हिजेसिटी संकुल हे युवा पिढीसाठी प्रेरणा
चिपळूण,दि.२१: गेली नऊ वर्षे अविरतपणे ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून डेरवण युथ गेम्सचे आयोजन करण्यात येते. यंदाचे युथ गेम्सचे हे १० वे वर्ष आहे. या वर्षातदेखील तोच उत्साह तोच जल्लोष मला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. राज्यभरातील हजारो खेळाडू यानिमित्ताने या ठिकाणी हजेरी लावतात. लाल मातीतल्या विविध लोप पावत चाललेल्या खेळांसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळ या ठिकाणी खेळवण्यात येतात. त्यामुळे डेरवण युथ गेम्स हे नवोदित उदयोन्मुख खेळाडूंसाठी मार्गदर्शक ठरत आहेत, असे प्रतिपादन चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी केले. आज डेरवण युथ गेम्सच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत मराठी अभिनेते संकर्षण कर्हाडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. आ. निकम यांच्या सह अभिनेते संकर्षण कर्हाडे यांनी संपूर्ण क्रीडा-संकुलाची माहिती घेतली. संस्थेच्या वतीने क्रीडा-संचालक श्रीकांत पराडकर यांनी दोघांचाही पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.