आता सावंतवाडीकरांना अनुभवता येणार नरेंद्र वन उद्यान निसर्गभ्रमंती……!

0
74

सावंतवाडी,दि.१५: येथील शहराचे वैभव असणाऱ्या व जैवविविधतेने समृद्ध असलेल्या नरेंद्र डोंगरावर पर्यटकांना उद्यापासून नरेंद्र वन उद्यान निसर्गपर्यटन सफारी वाहन, सावंतवाडी दर्शन मनोरा, निसर्गमाहिती केंद्र अशा सुविधा अनुभवता येणार आहेत. सावंतवाडी वन विभागांतर्गत येणाऱ्या नरेंद्र वन उद्यान येथे सिंधुरत्न योजनेतून पर्यटनवाढीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध निसर्गपर्यटन सुविधांचा अनुभव घेण्यासाठी सर्व सावंतवाडीकरांना आवाहन करण्यात येत आहे.
पर्यटकांना मोती तलावा शेजारी असलेल्या जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान ते नरेंद्र वन उद्यानापर्यंत जाण्यासाठी सफारी वाहनाने प्रवास करता येईल. नरेंद्र वन उद्यानामध्ये पोहोचल्यावर तिथे असलेला सावंतवाडी दर्शन मनोरा, निसर्ग माहिती केंद्र हे देखील पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे. जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान ते नरेंद्र डोंगर प्रवास करण्यासाठी उपलब्ध असलेले सफारी वाहन प्रत्येक २ तासाच्या अंतराने सकाळी ८ वाजता, १० वाजता,१२ वाजता, दुपारी २ वाजता, सायंकाळी ४ वाजता व शेवटची फेरी सायंकाळी ६ वाजता या वेळापत्रकानुसार सोडले जाईल. या नरेंद्र डोंगर सफारीसाठी भोसले उद्यान ते नरेंद्र डोंगर सफारी चार्जेस, गाईड चार्जेस व निसर्ग माहिती केंद्र प्रवेश फी हे सर्व मिळून एकत्रितरित्या प्रौढांसाठी १०० रु. प्रति व्यक्ती तर १४ वर्षांखालील लहान मुलांसाठी ५० रु. शुल्क करण्यात येणार आहे. तरी सावंतवाडीकरांनी या निसर्गपर्यटनाचा नक्की अनुभव घ्यावा असे आवाहन सावंतवाडी वन विभागाकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here