कलंबिस्त हायस्कूलमधील दहावी सदिच्छा समारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांना आवाहन…
सावंतवाडी,दि.२८: कलंबिस्त इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन व दहावी सदिच्छा समारंभ असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ, लेखक डॉ.रुपेश पाटकर,संस्था उपाध्यक्ष गोविंद लिंगवत, सचिव चंद्रकांत राणे, संचालक चंद्रकांत राऊळ, शशिकांत धोंड,मुख्याध्यापक अभिजीत जाधव, ज्येष्ठ शिक्षक शरद सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.रुपेश पाटकर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखल्या पाहिजेत. आपल्या क्षमता व मर्यादांची योग्य जाणीव म्हणजे आत्मविश्वास असे सांगत या आत्मविश्वासाच्या जोरावर प्रगती साधली पाहिजे.त्याचबरोबर कुमारवयीन विद्यार्थ्यांनी प्रेम व आकर्षण यातला फरक समजून घेतला पाहिजे. मोबाईल, सोशल मीडिया यांच्या वापराबाबत सजगता बाळगली पाहिजे असे उपयुक्त मार्गदर्शन करीत दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्था सचिव चंद्रकांत राणे, सहाय्यक शिक्षका विनिता कविटकर व नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेकरीता शुभेच्छा दिल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेतील आपल्या आजवरच्या आठवणींंचा आढावा घेत शाळा व शिक्षकांप्रती ऋणरुपी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी केले. प्रशालेचे सहाय्यक शिक्षक किशोर वालावलकर यांनी मराठी भाषा दिनाचे महत्त्व विषद करीत,प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी कु. वैष्णवी बिडये व मानसी सावंत यांनी केले.
तर आभार प्रदर्शन शिक्षक विलास चव्हाण यांनी केले.