चिपळूण नागरीतर्फे २५ रोजी सहकार मेळावा व कार्यशाळेचे आयोजन..!

0
48

चिपळूण,दि.२३: येथील नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे २५ रोजी सकाळी १०.३० वाजता चिपळूण-बहादूरशेखनाका येथे संस्थेच्या ‘सहकार भवन’ मध्ये सहकार मेळावा व कार्यशाळा संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
यावेळी सेवानिवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालयाचे एस. बी. पाटील उपस्थित राहणार आहेत.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल सुरू आहे. आर्थिक व्यवसायिकता सांभाळीत असतानाच गरजू, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा केला जातो. इतकेच नव्हे तर ठेवींवर देखील योग्य व्याज दर दिला जात आहे. तर सामाजिक बांधिलकी देखील तितकीच जपली जात आहे. यामध्ये महापुराच्या व कोरोना काळात संस्थेच्या पूरग्रस्त सभासदांना जीवनावश्यक वस्तूंचे किट, तिवरे धरणग्रस्त तसेच विदर्भ मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना सहकार्याचा हात, भव्य अस्थिरोग तपासणी शिबिर रक्तदान शिबिर यासारखे उपक्रम राबवून वित्तीय संस्थांमध्ये आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल १ कोटी रुपयांचा धनादेश देणारी महाराष्ट्रात चिपळूण नागरी पतसंस्था एकमेव पतसंस्था ठरली आहे.

तर संस्थेची १९ ऑक्टोबर १९९३ रोजी स्थापना झाली आहे. या संस्थेचे महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असून ५० शाखा आहेत. संस्थेचे ३१ जानेवारी २०२४ अखेर सभासद संख्या १ लाख ४१ हजार ९४ इतके असून भाग भांडवल ७१ कोटी १९ लाख रुपये, स्वनिधी १४७ कोटी ८५ लाख, ठेवी १०७८ कोटी ५ लाख, कर्जे ८५० कोटी ६७ लाख, पैकी प्लेज लोन ३५७ कोटी २८ लाख, पैकी सोने कर्ज ३२० कोटी २६ लाख, गुंतवणुका ३५४ कोटी ९० लाख, मालमत्ता ३८ कोटी ८० लाख, मार्च २३ अखेर नफा १९ कोटी १८ लाख रुपये अशी या संस्थेची आर्थिक स्थिती आहे.

संस्थेचा यशस्वी कारभार पाहत असताना चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सहकार चळवळ आणखी वृद्धिगंत व्हावी यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न असतात. यामध्ये सहकार प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातात. याच अनुषंगाने रविवार दिनांक २५ रोजी चिपळूण नागरीतर्फे ‘सहकार मेळावा व कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. यावी संस्थेचे सभासद हितचिंतक व चळवळीतील कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here