प्रकल्पग्रस्तांच्याच स्टॉलवर कारवाई का..? महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना संघर्ष समितीने विचारला जाब

0
55

सावंतवाडी,दि.१०: मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी अनधिकृत बांधकामे असताना देखील, आमच्यासारख्या बेरोजगार युवकांच्या स्टॉलवरच कारवाई का, असा सवाल आज बांदा टोलनाका स्टॉलधारक संघर्ष समितीच्या पदाधिकारी व युवकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला. खारेपाटण ते बांदा महामार्गावरील असलेले सर्व अतिक्रमण येत्या आठ दिवसांत न काढल्यास आम्ही पुन्हा स्टॉल उभारू, असा इशारा देखील स्टॉलधारक संघर्ष समितीच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.

बांदा स्टॉलधारक संघर्ष समितीच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी आज सावंतवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आर. पी. कांबळे यांना घेराव घातला. यावेळी अध्यक्ष आनंद वसकर, उपाध्यक्ष सागर मोर्ये, सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर,हेमंत दाभोलकर, अक्षय परब, प्रथमेश गडकरी, हर्षद गडकरी, प्रथमेश परब, रोहित रेडकर, महेश वसकर, प्रदीप कळंगुटकर, कौस्तुभ दळवी, सदाशिव मोयें, जयेश पटेकर आदी उपस्थित होते.

यावेळी समितीचे अध्यक्ष आनंद वसकर यांनी स्टॉलधारक सर्व तरुण हे स्थानिक ग्रामस्थ आहेत. आजपर्यंत शासनाने आमच्या शेती-बागायतीच्या जमिनी तिलारी प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग आणि टोलनाका या तिन्ही प्रकल्पांसाठी अत्यल्प मोबदल्यात दिल्या. त्यावेळी प्रकल्पांमध्ये नोकरी उपलब्ध होईल या आशेपोटी जमिनी शासनाला वर्ग केल्या. परंतु, प्रकल्पग्रस्त असुनही गेल्या ३५ वर्षांत एकाही तरुणाला ‘क’ दर्जाची नोकरी देखील शासनाकडुन दिली गेली नाही. सद्यस्थितीत येथील तरुण बेरोजगारीने त्रस्त असून शासनाचे सहकार्य न मिळाल्याने आम्ही आमच्याच शासनाला दिलेल्या जागेतील न वापरात असलेल्या जागी, वाहतुकीला कोणताही त्रास होणार नाही अशा ठीकाणी उदरनिर्वाहासाठी स्टॉल सुरू केले. परंतु, आम्हाला केवळ एका दिवसाची नोटीस देत पोलिस संरक्षणात आम्ही स्वतः खर्च करून उभे केलेले स्टॉल जमीनदोस्त करण्यात आले.ज्या कायद्याच्या अनुषंगाने आमच्यावर कारवाई करण्यात आली त्याच धर्तीवर खारेपाटण ते बांदा या महामार्गावरील असलेले सर्व अतिक्रमण आठ दिवसांत काढण्यात यावे. तसे न झाल्यास आम्ही उभारलेले स्टॉल पुन्हा सुरू करणार.यापुढे आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी सदर प्रकल्पग्रस्त स्टॉलधारक तरुण व त्यांच्या कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला असुन, महामार्ग विभाग, तिलारी प्रकल्प, टोलनाका येथे सदर सुशिक्षीत मुलांना नोकरी तसेच आपली वापरात नसलेली सदर जागा या प्रकल्पग्रस्त तरुणांना फुडमॉल व इतर व्यवसाय याकरीता भाडेतत्वावर उपलब्द करुन द्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ता गुरु कल्याणकर यांनी देत जाब विचारला.
यावर आर.पी.कांबळे यांनी नोकरी व भाडेतत्वावर जागा देणे याकरीता वरीष्ठांना अहवाल देतो व प्रयत्न करतो असे आश्वासन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here