सावंतवाडी,दि.२०: भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर आज सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीत त्यांनी आज तब्बल १ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
दरम्यान, सकाळच्या सत्रात जयु भाटकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्यातल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी सांगितले घरची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. वयाच्या १२ व्या वर्षांपर्यंत अनवाणी चालावं लागलं अशी आपली परिस्थिती होती. मात्र, अशा परिस्थितीत आपल्या आईने जिद्द सोडली नाही आणि महत्त्वाचे म्हणजे तिने आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही असेही त्यांनी सांगितले. आईने सांगितले विज्ञानाचा वापर गरिबांसाठी कर हे त्यांनी आवर्जून यावेळी सांगितले. आईच्या आठवणीने यावेळी डॉ. रघुनाथ माशेलकर भावुक झालेले पहायला मिळाले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचा सल्ला दिला. वाचनाशिवाय पर्याय नसल्याच त्यांनी सांगितलं. तंत्रज्ञानाच्या युगात आत्ताची मुलं वाचनात कुठेतरी कमी पडतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मुलांनी जास्तीत जास्त वाचावं अस आवाहनही त्यांनी यावेळी मुलांना केलं.
आपण कुठं जन्मलो याला महत्त्व नाही. श्रीमंत शिक्षण मिळाले तर आपले विचारही श्रीमंत होतात. त्यामुळे शालेय शिक्षण खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जात, धर्म, प्रांत, भाषा यांच्या भिंती तोडून आपण एकत्र यायला हवं. असंही त्यांनी सांगितले. आपण आपल्यातील संवाद हरवत चाललो आहोत. संवादाने अनेक प्रश्न सुटू शकतात, वाद टाळता येऊ शकतात असंही त्यांनी सांगितले.
यावेळी हळदीच्या पेटंट साठी अमेरिकेच्या विरोधात दिलेला लढा, बसुमाती तांदळाच्या पेटंटच्या बाबतीतले अनेक किस्से, विविध परिषदा, आंतरराष्ट्रीय प्रवास आणि कौटुंबिक घटना याबाबतीतले अनेक किस्से त्यांनी सांगितले.
यावेळी माध्यम सल्लागार जयु भाटकर, ज्येष्ठ पत्रकार सागर देशपांडे, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, चेअरमन अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, व्यवस्थापकिय समन्वयक सुनेत्रा फाटक, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप, YBIT प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य YBIT गजानन भोसले, डि. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सत्यजित साठे आदी उपस्थित होते.