‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर प्रा.रुपेश पाटील यांचे निरवडे येथे व्याख्यान..

0
63

सावंतवाडी,दि.२०: आपले वर्तन, भावना, प्रेरणा आणि वैचारिक बैठक यांचे एकत्रित प्रकटीकरण म्हणजे व्यक्तिमत्व होय. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज असते. तसेच व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते, त्याला कारणीभूत असणारी आणि वर्तनाला चालना देणारी शारीरिक, मानसिक यंत्रणेची संघटना असते. आपल्या व्यक्तिमत्व विकासात ‘स्व’ महत्वाचा घटक असतो. स्वतःतील क्षमता ओळखून व्यक्तिमत्त्वाला आकार द्यावा लागतो आणि हे आकार देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना अत्यंत प्रामाणिकपणे करत असते. व्यक्तिमत्त्वाची खरी जडणघडण महाविद्यालयीन स्तरावर करून देणारे सर्वोत्तम व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर असते, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते तथा महाराष्ट्र शासनाचा राज्य युवा पुरस्कार विजेते प्रा. रुपेश पाटील यांनी निरवडे येथे सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिरात केले. प्रा. रुपेश पाटील ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ निरवडेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता रवींद्रनाथ पाटकर होत्या. तर व्यासपीठावर कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ . यू. सी. पाटील, प्रा. डॉ. एस. जे. जाधव, प्रा . एम. व्ही. आठवले, प्रा. आर. बी सावंत आदी उपस्थित होते.

प्रा. रुपेश पाटील आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना हे महाविद्यालयीन जीवनात श्रमसंस्कार करणारे आणि ग्राम विकासाच्या समस्या आणि त्यांवर उपाय समजवून देणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. निवासी शिबिरांमधून आपल्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू पाडण्याचे काम होत असते. महाविद्यालयीन स्तरावर अशा प्रकारची श्रमसंस्कार शिबिरे विद्यापीठाच्या वतीने आयोजित करणे म्हणजे युवकांना व्यक्तिमत्व विकासासाठी चालना देणे आहे. येथे युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना देखील वाव दिला जातो. सकाळी भल्या पहाटे उठून योगा करण्याने आपल्या दिवसाची सुरुवात होते. तर रात्री शेवट प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून होतो. शिबिराच्या एकूण दिनचर्येचा विचार करता असे लक्षात येते की, युवकांचा खर्‍या अर्थाने व्यक्तिमत्व विकास साधण्याचे राष्ट्रीय सेवा योजना हे एकमेव व्यासपीठ काम करत असते, असे सांगत प्रा. पाटील यांनी आपल्या जीवनातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध शिबिरांच्या अनुभवाच्या गोष्टी शिबिरार्थींसमोर कथन केल्या.

पाहुण्यांचा परिचय स्वयंसेविका रुची मोहिते हिनी केला. सूत्रसंचालन अंकिता परब हिने तर आभार प्रदर्शन स्वयंसेविका धनश्री हिने केले. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. यू. सी. पाटील यांनी केले. यावेळी प्रा. रुपेश पाटील यांनी स्वयंसेवकांच्या विविध प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे देत त्यांची मने जिंकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here