मुंबई दूरदर्शन माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांनी सावंतवाडीतील पत्रकारांशी साधला संवाद
सावंतवाडी,दि.१९: मुंबई दूरदर्शन माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांनी आज सावंतवाडीतील पत्रकारांची संवाद साधला यावेळी त्यांनी बोलताना कोकणातील मुलांमध्ये उपजत बुद्धिमत्ता आहे.मात्र मुंबईसारख्या महानगरी आणि तेथील चंदेरी दुनियाचे आकर्षण त्यांना अधिक असल्यामुळे त्यांचे कौशल्य आणि श्रम याचा वापर मूठभर उद्योजक मंडळींना होत आहे. यापुढे मुंबईसारख्या महानगरीत आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे स्वतःचं स्थान बळकट करणाऱ्या, कौशल्यधिष्ठित युवकांनी आपल्या गावाची कास धरावी. त्यांनी आपल्या कोकणात येऊन स्वतःच्या गावाचा आणि पर्यायाने येथील पर्यटन व्यवसायाचा विकास करावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ निर्माता, दिग्दर्शक तथा दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांनी येथे व्यक्त केले. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने जयू भाटकर यांचा सस्नेह सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी श्री भाटकर संबोधित करीत होते. या कार्यक्रमास सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, मालवणी कवी दादा मडकईकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, शिवप्रसाद देसाई, विजय देसाई, राजू तावडे, रुपेश हिराप, प्रा. रुपेश पाटील,आनंद धोंड, शैलेश मयेकर, भगवान शेलटे, नरेंद्र देशपांडे, प्रसन्ना गोंदावळे, भुवन नाईक, नितेश देसाई यांची उपस्थिती लाभली.
दरम्यान आपल्या मनसोक्त गप्पांनी भाटकर यांनी कोकणच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारिता या सर्वच अंगांना स्पर्श करीत दिलखुलास गप्पा केल्या.
यादरम्यान ते म्हणाले कोकणची माती ही रत्नांची खाण आहे. इथल्या रत्नांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला नावलौकिक कमावलेला आहे. मराठी रंगभूमी आणि मराठी साहित्याला वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम इथल्या साहित्यिक आणि कलावंत मंडळींनी केलेले आहे. मुंबई दूरदर्शनवर काम करत असताना कोकणच्या मातीतला सुगंध नेहमीच जोपासला. त्यामुळेच मुंबईसारख्या मोठ्या शहरात मला कधीच कोणी स्पर्धक वाटलं नाही. कारण आपली स्पर्धा स्वतःची असावी, इतरांना आपले स्पर्धक समजून आपण आपले स्थान कमी करू नये, असेही आवाहन श्री. भाटकर यांनी केले.
कोकणवासियांचा विदेशातही डंका..!
मराठी भाषेचे साहित्य विश्व फुलवणाऱ्या साहित्यिकांनी आणि कोकणातील मातीतल्या व्यक्तिमत्त्वांनी विदेशातही आपला डंका वाजवल्या असल्याचे जयू भाटकर म्हणाले.
नुकत्याच मॉरिशस येथे संपन्न झालेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या आठवणी देखील त्यांनी यावेळी पत्रकारांसोबत शेअर केल्या.
कवी वसंत सावंत यांची जयंती होणार नावीन्यपूर्ण उपक्रमांनी :
दरम्यान आपल्या औपचारिक गप्पात श्री. भाटकर यांनी कोकणभूषण कविवर्य वसंत सावंत यांची आगामी जयंती सावंतवाडी तालुका मराठी पत्रकार संघातर्फे साजरा करण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या या विनंतीला मान देत सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांनी तात्काळ दुजोरा देत मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी आणि सावंतवाडीचे भूषण असलेले कविवर्य वसंत सावंत यांची ११ एप्रिल २०२४ रोजी येणारी जयंती मोठ्या दिमाखात साजरा करण्याचे मान्य केले. तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे जयू भाटकर यांनी दिलेल्या सर्व सूचना आणि त्यांच्या विनंतीचा मान राखून आगामी काळात कविवर्य वसंत सावंत यांना सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे आगळी वेगळी जयंती कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करून त्यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना मानवंदना देण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे आभार सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी मानले.