सिंधुदुर्ग, दि.०६ : कणकवली महाविद्यालयाचे ग्रामीण विकास विभाग प्रमुख, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष व विविध सामाजिक संघटनांमध्ये सातत्याने कार्यरत असणारे डॉ. राजेंद्र मुंबरकर यांना ‘ऑल जर्नालिस्ट ॲण्ड फ्रेंड सर्कल’ या भारतातील पहिल्या पत्रकार संघटनेचा त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार २०२३’ जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार नांदेड येथे होणाऱ्या १८ व्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात २४, डिसेंबर २०२३ रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर हे कणकवली महाविद्यालयातील प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वपरिचित आहेत. गेली तीस वर्षे ते शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना संस्कारक्षम व व्यक्तिगत पातळीवर सक्षमपणे घडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून डॉ. राजेंद्र मुंबरकर यांचा परिचय आहे.
डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी गोपुरी आश्रमाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात छोट्या काजू प्रक्रिया उद्योगातून स्वयं रोजगार निर्माण करण्यासाठी नाबार्डच्या समूह विकास योजनेतून महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सहकार्याने २००३ ते २००६ या काळात विशेष प्रयत्न केले. हा प्रकल्प संपल्यानंतरही त्यांनी या प्रकल्पाचे काम आजही सुरू ठेवले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात छोट्या काजू प्रक्रिया उद्योगाला चालला मिळाली असून हा प्रयोग चांगला यशस्वी झाला आहे. तसेच शासनाच्या विविध समित्यांमध्ये त्यांचा सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी म्हणून सहभाग राहिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळ प्रक्रिया धारक एकत्र करून २००६ साली ‘सिंधुदुर्ग जिल्हा प्रक्रिया उत्पादक संघ’ सुरू करण्यात त्यांचा प्रमुख पुढाकार राहिला आहे. आज ही संस्था फळ प्रक्रिया धारक उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे.
डॉ. राजेंद्र मुंबरकर आंबेडकरवादी, समाजवादी, परिवर्तन वादी आणि गांधीवादी विचारांच्या चळवळीत सातत्याने सक्रिय असतात. समाजात समानता निर्माण व्हावी यासाठीची परिवर्तनवादी चळवळीतील भूमिका सर्वपरिचित आहे.
अलिकडेच कोकण विभागात स्थापन झालेल्या ‘अपरांत साहित्य,कला प्रबोधिनीचे’ सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.आनंद विकास मंडळ, मिठमुंबरी,ता.देवगड,दर्पण प्रबोधिनी, सिंधुदुर्ग या संस्थांचे सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत.कोकण काजू समुह या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
यापूर्वी त्यांना २००३ साली पूणे येथील राजीव शेठ साबळे फौंडेशन या संस्थेचा ‘ग्रामीण विकास गौरव पुरस्कार’ २००३, राष्ट्रीय सेवा योजना, मुंबई विद्यापीठ- जिल्हास्तरीय आदर्श कार्यक्रम अधिकारी पुरस्कार २००७, राष्ट्रसेवा दल, महाराष्ट्र चा ‘समाज शिक्षक पुरस्कार २०१५ आणि कै.डॉ. वसंतराव गंगावणे स्मृती पुरस्कार २०१९ आदी पुरस्कारांनी डॉ. मुंबरकर यांचा सन्मान करण्यात आला आहे.
ऑल जर्नालिस्ट ॲण्ड फ्रेंड सर्कल च्या राज्यस्तरीय पुरस्काराने डॉ. राजेंद्र मुंबरकर यांना भविष्यात सामाजिक आणि शैक्षणिक काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. डॉ .राजेंद्र मुंबरकर यांच्या निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.