स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई – ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त
सावंतवाडी,दि.०८ : अवैध रित्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोन अलिशान कार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून पकडण्यात आल्या ही कारवाई मुंबई गोवा महामार्गावर नेमळे येथे शुक्रवारी करण्यात आली असून यामध्ये ८ लाख ३२ हजार ८०० रुपयांच्या दारूसह ३० लाख रुपये किमतीच्या दोन गाड्या असा मिळून ३८ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून दोन आलिशान गाड्यांमधून गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सिंधुदुर्ग पथकाने सापळा रचला होता.
यात एक अलिशान कार (एम एच ०१ – बीसी – १६१६ व स्विफ्ट कार क्र. एम एच ०७ – एबी ५३५४ या दोन कार मुंबई गोवा महामार्गावर नेमळे येथे आल्या असता पोलिसांकडून त्याना थांबण्याचा इशारा दिला यावेळी या दोन्ही कार मध्ये मोठ्याप्रमाणात दारू साठा आढळून आला.
८ लाख ३२ हजार ८०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारु यात होती तर या दोन्ही कारची किमत ३० लाख रुपये असा दोन्ही मिळून ३८ लाख ३२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर या प्रकरणी चेतक भरत वाळवे, (२७ रा. तिवरे वाळवेवाडी, ता. कणकवली) महेश्वर हनुमंत मोरे ( ३७ रा. कलमठ मोरेश्वरनगर, ता. कणकवली ) या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून अधिक तपास
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, याच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक संदिप भोसले, सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग आदिसह हेड कॉन्स्टेबल प्रकाश कदम, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, पोलीस नाईक चंद्रकांत पालकर व चंद्रहास नार्वेकर यांचे पथकाने केली.
दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपींविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात होणार आहे.