कै.राजन रेडकर यांचे कार्य पुढे नेण्याचा केला निर्धार
वेंगुर्ले,दि .०२ : भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कोकण विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी राजन बापू रेडकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने समितीच्या कोकण विभागीय कार्यकारिणी मध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. कै. राजन रेडकर यांचा नेतृत्वाखाली व मार्गदार्नखाली सिंधुदुर्गातील अनेक भ्रष्टाचार व कामातील अनियमितता, ऐतिहासीक वास्तूची हानी अशी अनेक प्रकरणे समितीने लावून धरली होती. ह्या कामांना पुन्हा गती मिळावी व विविध न्यायालयात प्रलंबित असणारी प्रकरणे मार्गी लावावीत यासाठी कार्यकर्त्यांनी कै. राजन रेडकर यांचे पोलीस दलातील त्यांचे जीवलग सहकारी श्री. अशोक सावंत, मुंबई यांना या कार्यात सहभागी होण्याची विनंती केली होती. त्यांनी ती विनंती मान्य करून कै. राजन रेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व सर्व प्रकाराने धसास लावण्यासाठी कोकण विभाग सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. ते मुंबई पोलीस अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. सध्या ते विविध सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीमुळे समितीच्या जिल्ह्यातील आता सर्व प्रलंबित प्रकरणांना गती मिळणार असल्याने कार्यकर्त्यां मध्ये उत्साह पसरला आहे.