केसरकरांच्या गद्दारीचा पराभव करून बदला घेणार!

0
90

ठाकरे शिवसेनेचा निर्धार : केसरकरांंकडून विधानसभा मतदारसंघात एकही भरीव काम नाही – रुपेश राऊळ


सावंतवाडी, दि. २१ : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे गद्दाराच नव्हे तर महागद्दार आहेत. ते गद्दारांचे म्होरके आहेत. त्यांनी गतवर्षी गद्दारी करून शिवसेनेला व शिवसैनिकांना वेदना देण्याचे काम केले. अशा गद्दार आमदार दीपक केसरकर यांचा येत्या निवडणुकीत पराभव करण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला असून त्यांनी दिलेल्या वेदनांचा शिवसैनिक बदला घेतला जाईल, असा इशारा मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे शिवसेनेच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुकाप्रमुखांनी दिला. केसरकरांनी बंडाच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना सोडली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात २२ तारखेला आंदोलन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यभरात आजचा दिवस ठाकरे शिवसेनेतर्फे गद्दार दिन म्हणून साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुकाप्रमुख राऊळ, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, संदीप पेडणेकर आदी उपस्थित होते.

तिन्ही तालुका प्रमुखांनी केसरकरांच्या भूमिकेच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. केसरकर शिवसेनेच्या जीवावर निवडून आले. परंतु, त्यांनी आपल्या स्वार्थासाठी शिंदे गटाशी हातमिळवणी करीत शिवसेनेशी गद्दारी केली. त्यामुळे त्यांनी दिलेल्या वेदना या शिवसैनिक कदापिहीं विसरणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा बदला घेतला जाणार आहे. निश्चितच त्यांना पराभवाची धूळ चारली जाणार आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी आत्तापासूनच तयारी केली आहे.

राऊळ म्हणाले, शिवसेनेत असताना केसरकर यांनी वारंवार आपली प्रॉपर्टी विकून आपण राजकारण केले, असा दावा केला होता. मात्र, आता ते मोठे-मोठे मेळावे, सहली आयोजित करीत आहेत. अनेकांना लाखो रुपयांच्या देणग्या देत आहेत. हे पैसे नेमके कोठून आले, त्या पन्नास खोक्यांमधील तर हे पैसे नाहीत ना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केसरकर यांनी विधानसभा मतदारसंघात एकही भरीव काम केलेले नाही. पूर्वी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये असताना कामे होत नसल्याची तक्रार केली होती. परंतु, आता ते शालेय शिक्षणमंत्री आहेत. मग आता कामे का होत नाहीत. लोकांना आश्वासन देण्याचे आणि फसवण्याचे काम केसरकर करत आले आहेत. त्यांच्या भूलथापांना आता जनता कंटाळली आहे, असे राऊळ म्हणाले.

बाबुराव धुरी म्हणाले, केवळ घोषणा करण्यापलिकडे केसरकर यांनी काहीही केले नाही, एकाही विकासकामाचे उद्घाटन झालेले नाही. फक्त भूमिपूजन करण्याचे काम त्यांनी करुन लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम केले आहे. मतदारसंघातील जनता त्यांना कदापीही माफ करणार नाही. मायकल डिसोजा म्हणाले, केसरकर हे ४० बंडखोरांचे म्होरके आहेत. यापुढे ते निवडून येणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here