भोगवे किनारी मनसोक्त मित्रांसोबत मारला फेरफटका..
सिंधुदुर्ग,दि.२४ : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आपल्या ५० व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गात दाखल झाला असून तो आपला वाढदिवस भोगवे येथील समुद्रकिनारी असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा करणार आहे सचिन रविवारी दुपारीच मित्रांसमवेत गोवा मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला असून सायंकाळी तो भोगवे किनारी फेरफटका मारताना अनेकांना दिसला.
क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचा आज सोमवारी पन्नासावा वाढदिवस आहे यापूर्वी वाढदिवसाच्या सेलिब्रेशन साठी सचिन जगातील वेगवेगळ्या अशा पर्यटन स्थळी गेला होता. पण प्रथमच सचिन आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मित्रांसमवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला आहे. भोगवे येथील समुद्रकिनारी एक पंचतारांकित हॉटेल्स असून या हॉटेलमध्ये यापूर्वी अनेक अभिनेते तसेच क्रिकेटपटू ही येऊन गेले आहेत.
विशेषता या हॉटेलमध्ये मध्यंतरी आशिष नेहरा अजय जडेजा ही येऊन गेला होता. त्यामुळेच कदाचित सचिन या ठिकाणी आला असावा असा अंदाज आहे. सचिन दुपारीच मुंबईहून गोवा येथील मोपा मनोहर इंटरनॅशनल विमानतळावर दाखल झाला यावेळी त्याला चाहत्यांनी एकच गराडा घातला होता पण त्यातून तो मार्ग काढत सिंधुदुर्गच्या दिशेच्या दिशेने निघून गेला
सचिनचे अनेक चाहते सर्वत्र आहेत त्यामुळे कुठेही वाढदिवस साजरा केल्यानंतर चाहत्यांचा गराडा त्याला पडत असतो मात्र भोगवे किनारी पर्यटकांची सहसा ये जा नसते त्यामुळे सचिनला वाढदिवसाचे चांगले सेलिब्रेशन करता येणार आहे.
सचिन चे सिंधुदुर्ग शी जवळचे नाते सचिनच्या क्रिकेटची सुरुवात जरी मुंबई येथे झाली असली तरी तो अनेक वेळा सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर गुरु रमाकांत आचरेकर यांच्या समवेत क्रिकेट खेळण्यासाठी येत असे अनेक क्रिकेट सामने ही त्याने याच मैदानावर खेळले आहेत. आपल्या मुलाखतीत ही सचिनने सावंतवाडीचा वेळोवेळी उल्लेख केला आहे.