सावंतवाडी : विधानसभा मतदार संघात भाजपाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या “महाविजय” अभियानाचा समारोप सावंतवाडीत होणार असून यानिमित्त १९ एप्रिलला सायंकाळी ६:०० वाजता गांधी चौक येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजप महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ व माजी खासदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, बंड्या सावंत, बंटी राजपूरोहीत अजय सावंत उपस्थित होते.
तेली म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात २ एप्रिल पासून भाजपाच्या महाविजय अभियानाला सुरुवात करण्यात आली होती. हे अभियान आता पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे १९ एप्रिलला या अभियानाचा समारोप करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा गांधी चौकात होणार आहे. यावेळी मंत्री चव्हाण यांच्यासह चित्रा वाघ व निलेश राणे हे मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्याला सायंकाळी सहा वाजता सुरुवात होणार असून मोठ्या संख्येने सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग या विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा भाजपाच्या माध्यमातून तेली यांनी केले आहे.आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका शतप्रतिशत भाजपा करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने या अभियानाच्या माध्यमातून तशी तयारीही केली आहे, असा दावा त्यांनी केला.
चौकट
आठवडा बाजार मोती तलावाकठीच हवा : संजू परब
मंत्री दीपक केसरकर चुकीच्या पध्दतीने आठवडा बाजार हलविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही सर्वाशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला होता. आठवडा बाजारासाठी स्वार हॉस्पिटल समोरील जागा संयुक्तीक नाही. त्या ठीकाणी यापुर्वी दोनदा बाजार घेण्यात आला होता. त्यावेळी खुप गैरसोय झाली होती. आत्ता सोडा पावसाळ्यात चिखल झाल्यानंतर मैदानावर कसा काय बाजार होणार, असा ही प्रश्न त्यांनी केला. तर ज्यावेळी आम्ही हा बाजार केसरकरांनी आत्ता सुचविलेल्या जागेत नेला होता. त्यावेळी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला होता. मग आता ती जागा मंत्री केसरकरांना कशी काय योग्य वाटू शकते, असा उलट सवाल माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी उपस्थित केला आहे.
Home ठळक घडामोडी सावंतवाडीत भाजपची महाविजय रॅली19 एप्रिलला आयोजन: मंत्री चव्हाण यांच्यासह चित्रा वाघ यांची...