अन्यथा शेतकर्यांना बंदुका वापरण्याचा परवाना द्या,… शिवसेना शिष्टमंडळाची मागणी
सावंतवाडी,दि.२१ : माकड, गवे आदी वन्य प्राण्यांकडुन मोठ्या प्रमाणात शेतकरी बागायतदारांचे नुकसान होत आहे त्यामुळे अनेक संकटांनी आधीच वैतागलेला शेतकरी आणखी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे याबाबत योग्य ते धोरण ठरवा, अन्यथा शेतकर्यांना बंदुका वापरण्याच्या परवाना द्या, अशी मागणी माजी खासदार सुधीर सावंत यांनी केली.
दरम्यान या मागणीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी भेट घेवून चर्चा केली.त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, योगेश तुळसकर, किसन मांजरेकर गजानन नाटेकर उपस्थित होते.
सावंत म्हणाले, जंगलात नव्याने दोनशे कृत्रिम पाणवठे तयार करण्यात येणार आहेत. तसेच वन्य प्राणी शेती बागायतीकडे येणार नाहीत यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत, वन्य प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आणि बागायतदारांसह सर्वसामान्य माणूस सुध्दा मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना मनुष्यवस्तीपर्यत येण्यासाठी रोखण्यात यावे, अशी मागणी आम्ही वन अधिकारी रेड्डी यांच्या सोबत चर्चा केली.
यावेळी वन्य प्राणी वस्तीत घुसू नयेत यासाठी त्यांच्यासाठी पाणवठे नव्याने बांधण्यात यावे, जंगलात त्यांना खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी “ओटा”सारखी झाडांची जंगलात लागवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच यामागण्या पुर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर बैठक घेवून याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा आणि त्या मागण्या पुर्ण करणे शक्य नसल्यास आम्हाला शेतकर्यांना बंदुका वापरण्याच्या परवानग्या द्या, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान रेड्डी यांनी आश्वासन दिले आहे. जुने पाणवठे पुर्नजिवीत करण्यात येणार आहेत. तसेच नव्याने दोनशे पाणवठे बांधण्यात येणार आहे तसेच वन्य प्राणी वस्तीत जावू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जंगलाला लागून असलेल्या नागरिकांनी आम्हाला सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे आवाहन रेड्डी यांनी केल्याचे सावंत म्हणाले.
शेतकर्यांची होणारी नुकसानी मोठी आहे. दुसरीकडे अखंड सातबारा पध्दत असल्यामुळे तसेच देण्यास येणारी नुकसान भरपाईची रक्कम कमी असल्यामुळे अनेक शेतकर्यांना त्याचा फटका सहन करावा लागतो. त्यामुळे वन्यप्राण्याबाबत योग्य ते धोरण ठरविण्यात यावे त्याची नसबंदी करण्यात यावी किंवा माकडांना मारण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.