सावंतवाडी, दि.२९: सावंतवाडी येथील आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापारी आणि ग्राहकांची होणारी गैरसोय लक्षात घेता, बाजार परिसरातील पर्यटन केंद्रातील बंद असलेले स्वच्छतागृह तातडीने दुरुस्त करून खुले करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रेयश मुंज यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले आणि पालिका प्रशासनाला निवेदन देऊन सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
नगरपालिकेच्या माध्यमातून येथील आठवडा बाजार पर्णकुटी विश्रामगृह परिसरात स्थलांतरित करण्यात आला आहे. शहराच्या एका बाजूला हा बाजार असल्याने वाहतुकीला किंवा नागरिकांना कोणताही त्रास होत नाही, या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. मात्र, या ठिकाणी येणाऱ्या शेकडो व्यापारी आणि ग्राहकांसाठी स्वच्छतागृहाची कोणतीही सोय उपलब्ध नाही. विशेषतः महिला व्यापाऱ्यांना आणि महिला ग्राहकांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या या बाजार परिसराला लागूनच नगरपालिकेचे पर्यटन सुविधा केंद्र आहे, मात्र त्यातील स्वच्छतागृह सध्या बंद अवस्थेत आहे. नवीन स्वच्छतागृह उभारण्याऐवजी, आहे त्याच केंद्राची डागडुजी केल्यास पालिकेचा खर्च वाचणार आहे. हे बंद असलेले स्वच्छतागृह तातडीने नूतनीकरण करून जनतेसाठी उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून महिलांची गैरसोय टळेल, असे मुंज यांनी निवेदनात म्हटले आहे.
नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी याप्रश्नी गांभीर्याने लक्ष देऊन व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



