सावंतवाडी,दि .२०: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित बाल कला, क्रीडा व ‘ज्ञानी मी होणार’ महोत्सव २०२५-२६ अंतर्गत आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय समूहनृत्य स्पर्धेत सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या कळसुलकर प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकावून दिमाखदार यश संपादन केले आहे. या घवघवीत यशामुळे या शाळेचा संघ आता सावंतवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेत कळसुलकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अत्यंत लयबद्ध, भावपूर्ण आणि शिस्तबद्ध नृत्यप्रस्तुतीने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणाचे विशेष कौतुक परीक्षक श्रीमती चव्हाण व श्रीमती जामसंडेकर यांनी केले असून त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या विजयानंतर प्रशालेत आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

विजेत्या संघाचा गौरव सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती सरिता परब, गटसमन्वयक कमलाकर ठाकूर, केंद्रप्रमुख वालावलकर, लक्ष्मीदास ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तळवणेकर, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक प्रदीप सावंत उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरविण्यात आले.
या यशामागे शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले असून, पालकांचेही उत्तम सहकार्य मिळाले. या यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचे संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. कळसुलकर प्राथमिक शाळेच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेत मानाचा तुरा रोवला गेला असून, आता जिल्हास्तरीय स्पर्धेत हा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



