सावंतवाडी,दि.०२: दक्षिण कोकणचे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव येत्या ६ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा जत्रोत्सव आणि आगळ्यावेगळ्या ‘लोंटांगणाच्या जत्रे’मुळे या उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर, देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांनी जत्रोत्सवाची जय्यत तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार
जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविक आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन यंदा विशेष नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंदिराकडे ये-जा करणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी बाजूला करून रस्ता सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने ग्रामस्थांनी गेल्या चार-पाच दिवसांपासून हे काम स्वयंस्फूर्तीने सुरू केले आहे. वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी खुद्द ग्रामस्थ या कामात सक्रिय सहभागी झाले आहेत.
सध्या मंदिर परिसराची साफसफाई, विद्युत रोषणाई आणि मंडप व्यवस्था उभारणीची कामे वेगाने सुरू आहेत.
दरवर्षी येणाऱ्या भाविक-भक्तांची आणि वाहनांची मोठी संख्या लक्षात घेता, यावर्षी पार्किंग व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला आहे.
यावर्षी जत्रोत्सवावर पावसाचे सावट असल्याने, तशा प्रकारची उपाययोजना करण्याचे नियोजनही देवस्थान कमिटीने केले आहे.
जत्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सावंतवाडी पोलीस प्रशासनाला याबाबत कळविण्यात आले असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही चोख नियोजन करून उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी देवस्थान कमिटीने कंबर कसली आहे.
एकंदरीत, सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीच्या या आगळ्यावेगळ्या जत्रोत्सवाची ओढ आता सर्वांना लागून राहिली आहे.



