माहिती अधिकार कार्यकर्ते सुशिल चौगुले यांच्या तक्रारीची दखल; गटविकास अधिकाऱ्यांचा सरपंचांना निर्देश
सावंतवाडी,दि.२९ : तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायत हद्दीतील गुलाबी तिठा येथील एका नवीन इमारतीलगत बांधण्यात आलेली बेकायदेशीर व अनधिकृत संरक्षक भिंत तात्काळ हटवण्याचे आदेश सावंतवाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच, या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दल माजगाव ग्रामपंचायत अधिकारी श्री. परब यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईसह निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देशही माजगाव सरपंचांना देण्यात आले आहेत.

माजगाव (म्हालटकरवाडी) येथील माहिती अधिकार पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते सुशिल रुपाजी चौगुले यांनी दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी याबाबत अर्ज दाखल केला होता. यामध्ये त्यांनी गुलाबी तिठा, मोरजकर घरामागील सर्व्हे नंबर २४५, हिस्सा नं. ५, ९ व १० मधील नवीन इमारत बांधकामाजवळ अनधिकृत संरक्षक भिंत बांधण्यात आल्याची तक्रार केली होती. याच तक्रारीत त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अधिकारी श्री. परब यांच्यावर कारवाईची मागणीही केली होती.

श्री. चौगुले यांच्या अर्जाची आणि मान. तहसीलदार यांच्याकडील १३ ऑगस्ट २०२५ च्या संबंधित पत्राची दखल घेत गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक यांनी हे आदेश दिले आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतीने संदर्भीय पत्राद्वारे पाठवलेला अहवाल हा ‘मोघम स्वरुपाचा’ असल्याचे ताशेरे ओढत, गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंचांना या प्रकरणाची पुन्हा सखोल तपासणी करण्यास सांगितले आहे.

BDO नाईक यांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, “अर्जदार श्री. सुशिल चौगुले यांचे म्हणणे विचारात घेऊन, त्यांच्यासमवेत प्रत्यक्ष ग्रामपंचायत येथे सुनावणी अथवा चर्चा करूनच पुढील नियमानुसार कार्यवाही करावी.” तसेच, संबंधित अनधिकृत भिंत तात्काळ हटवून, श्री. परब यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीचा वस्तुनिष्ठ, स्वयंस्पष्ट अहवाल विलंब न करता तत्काळ सादर करावा, असेही बजावण्यात आले आहे.



