सिंधुदुर्ग आणि कणकवली येथे चार लांब पल्ल्याच्या जलद गाड्यांना थांबा

0
69

पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विन कुमार वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर रेल्वे बोर्डाकडून निर्णय

सिंधुदुर्ग,दि.१८: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन कुमार वैष्णव यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे.त्यानुसार सिंधुदुर्ग- ओरोस आणि कणकवली रेल्वे स्थानकांवर चार लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे बोर्डाकडून १७ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय लागू करण्यात आला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विन कुमार वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती त्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरले असून रेल्वेने सिंधुदुर्ग व कणकवली बस स्थानकावर मागणीप्रमाणे गाड्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंधुदुर्ग स्थानकावर एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस आणि एर्नाकुलम – अजमेर मरुसागर एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. तर कणकवली स्थानकावर, हिसार – कोयंबतूर एक्सप्रेस आणि गांधीधाम – नागरकोइल एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.

रेल्वे बोर्डाने स्थानिक स्तरावर तिकिट विक्रीवर लक्ष ठेवण्याचे, या निर्णयाची व्यापक प्रसिद्धी देण्याचे आणि अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोकण रेल्वे कोकणच्या माणसाची आहे. यामुळे त्याचा लाभ कोकणला मिळाला पाहिजे या भावनेतून नामदार नितेश राणे या रेल्वे कोकणात थांबल्या पाहिजेत म्हणून खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील होते. त्याला यश आले असून रेल्वे प्रवाशांकडून आनंद व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here