सावंतवाडी,दि.०७: सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण अखेर जाहीर झाले असून, यावेळचे सभापतीपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. या नव्या आरक्षणामुळे सावंतवाडी पंचायत समितीवर पुन्हा एकदा ‘महिलाराज’ येणार हे निश्चित झाले आहे. या पदासाठी आता राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला असून, २४ व्या सभापती म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गेल्या पंचवार्षिक कार्यकाळातही पंचायत समितीचे सभापतीपद महिलांकडेच होते. या काळात मानसी धुरी आणि निकिता सावंत यांनी यशस्वीरित्या सभापतीपदाचा कारभार पाहिला होता. आता पुन्हा एकदा महिला सदस्याला संधी मिळणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. विशेषतः, अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेला हे पद मिळणार असल्याने, या प्रवर्गातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हे पद भूषवणारी महिला ९वी महिला सभापती ठरणार आहे.
या आरक्षण सोडतीनंतर तालुक्यातील प्रमुख राजकीय आघाड्या असलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. दोन्ही आघाड्यांकडून आपल्याच पक्षाचा सभापती व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे आता कोणत्या आघाडीकडे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला सदस्य आहेत आणि कोणाची दावेदारी प्रबळ ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, दोन्ही आघाड्यांकडून बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू होईल. सभापतीपदासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक आपल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात करतील. त्यामुळे सावंतवाडीच्या राजकीय वर्तुळात चैतन्य निर्माण झाले असून, नव्या सभापतीच्या निवडीपर्यंत विविध राजकीय डावपेच पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे.



