सावंतवाडी,दि.०७: महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाशी संलग्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत आपले गणितीय कौशल्य आणि प्राविण्य सिद्ध केले आहे.
इयत्ता आठवीतून या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या एकूण पंचवीस विद्यार्थ्यांपैकी अकरा विद्यार्थ्यांनी ७५ पेक्षा जास्त गुण मिळवून विशेष प्राविण्य दाखवले, तर बारा विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या उत्कृष्ट कामगिरीमुळे, सर्व यशस्वी विद्यार्थी जिल्हास्तरावर होणाऱ्या गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
या यशामागे विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक अरुण गावडे सर यांची मोलाची साथ आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक अरुण गावडे यांचे संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊळ, सचिव जॉय डॉन्टस, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे आणि सर्व संचालकांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच, जिल्हास्तरीय गणित प्राविण्य परीक्षेसाठी सर्वांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.



