सिंधुदुर्ग, दि.०७: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदाच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. बँकेतर्फे या उमेदवारांना परीक्षेच्या तयारीसाठी विनामूल्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.
बँकेच्या लिपिक श्रेणीतील ७३ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ५०७७ अर्ज दाखल झाले आहेत. परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना योग्य दिशा मिळावी आणि त्यांना परीक्षेच्या स्वरूपाची माहिती व्हावी, या उद्देशाने हे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण शिबिर पुढील आठवड्यापासून सिंधुदुर्ग नगरी येथे सुरू होणार आहे.
या प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांना आपले नाव नोंदवणे आवश्यक आहे. यासाठी बँक एक विशेष गूगल फॉर्म लिंक https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfbNu6Lft4lQY_7dnyjvHvws81Ec0RXmr9RSiKhlDC8xe4GIw/viewform?usp=header
प्रसिद्ध करत आहे. उमेदवारांनी या लिंकद्वारे आपली नोंदणी करावी, असे आवाहन बँकेने केले आहे.
यावेळी बोलताना अध्यक्ष मनीष दळवी यांनी भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, “बँकेने भरती प्रक्रियेची जबाबदारी ‘आयबीपीएस’ (IBPS) सारख्या नामांकित आणि राष्ट्रीय स्तरावरील संस्थेवर सोपवली आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांना किंवा आमिषांना बळी पडू नये. कोणीही नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये.”
उमेदवारांनी केवळ आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून गुणवत्ता सिद्ध करावी आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत स्थान मिळवावे, असे आवाहनही श्री. दळवी यांनी केले आहे. या मोफत मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेऊन जिल्ह्यातील तरुणांनी बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी साधावी, असेही ते म्हणाले.



