पत्रकार संरक्षण आणि संबंधित व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सिंधुदुर्ग, दि.०१: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार आणि ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज’चे संपादक सीताराम गावडे यांना काही व्यावसायिकांकडून लक्ष्य केले जात असून, त्यांचा आवाज दाबण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गावडे यांच्या निर्भीड पत्रकारितेमुळे जिल्ह्यातील अनेक अवैध धंदे उघडकीस आल्याने, काही व्यावसायिक लॉबीने त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल करत बदनामीकारक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व उपाध्यक्ष समील जळवी यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पत्रकार सीताराम गावडे हे गेली अनेक वर्षे आपल्या लेखणीतून जिल्ह्यातील सामाजिक अपप्रवृत्ती, अमली पदार्थ, गोवा बनावटीची दारू आणि इतर अनेक अवैध धंद्यांवर निर्भीडपणे प्रकाश टाकत आहेत. त्यांच्या बातम्यांमुळे समाजात जनजागृती होऊन अनेक गैरप्रकार थांबले आहेत.
मात्र, गावडे यांच्या सत्यशोधक पत्रकारितेचा काही व्यावसायिकांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी संघटितपणे गावडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. इतकेच नव्हे, तर चिवला बीच येथील एका होमस्टे मालकाने गावडे यांना फोन करून “तुम्ही हप्ते घेता, हप्त्यासाठी बातम्या छापता” असे खोटे आरोप केले. या संभाषणाची ऑडिओ क्लिप जाणीवपूर्वक व्हायरल करून त्यांची सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला आहे,असे या निवेदनात म्हटले आहे.
हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवरील हल्ला असून, पत्रकारांना धमकावून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. याचा तीव्र निषेध करत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांना एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनातून संघटनेने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
१. जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांच्या जीविताला धोका असल्याने त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे.
२. चिवला बीचवरील होमस्टे मालकाने केलेल्या बदनामीकारक फोन कॉल आणि व्हायरल क्लिपचा स्वतंत्र तपास करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा.
३. चिवला बीचसह जिल्ह्यातील सर्व होमस्टे आणि व्यवसायांची शासनमान्यता, परवानग्या व कायदेशीर कागदपत्रे कसून तपासावीत.
४. परवानगीशिवाय आणि नियमबाह्य सुरू असलेल्या होमस्टे व्यवसायांवर तात्काळ कारवाईचे आदेश द्यावेत.
५. पत्रकारांची बदनामी करून त्यांच्या लेखणीला गप्प करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. सत्याला गप्प बसविण्याचा हा लोकशाहीविरोधी प्रकार असून, प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व उपाध्यक्ष समील जळवी यांनी केली आहे.



