पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने प्रशासनाची कारवाई; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
सावंतवाडी,दि.१८: सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे गावातील ‘होळीचे भाटले’ ते ‘बांदिवडेवाडी’ पर्यंत जाणारा सार्वजनिक रस्ता तब्बल ३५ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर अतिक्रमणमुक्त झाला आहे. पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या विशेष निर्देशानंतर प्रशासनाने १७ सप्टेंबर २०२५ रोजी धडक कारवाई करत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या ऐतिहासिक क्षणामुळे धाकोरे आणि बांदिवडेवाडीच्या ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गेली ३५ वर्षे हा महत्त्वाचा रस्ता काही व्यक्तींनी अतिक्रमण करून पूर्णपणे बंद केला होता, ज्यामुळे अनेक कुटुंबांची मोठी गैरसोय होत होती. ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी करूनही हा प्रश्न प्रलंबित होता. अखेर, सामाजिक कार्यकर्ते आत्माराम साटेलकर यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधले आणि उपोषणाचा मार्गही स्वीकारला होता. १५ ऑगस्ट रोजी त्यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांना या गंभीर समस्येची माहिती दिली, त्यानंतर पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तात्काळ आणि ठोस कारवाईचे आदेश दिले.
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली. १७ सप्टेंबर रोजी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
रस्ता मोकळा झाल्यानंतर ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. त्यांनी तहसीलदार श्रीधर पाटील आणि प्रशासकीय टीमचे आभार मानले. या यशाचे संपूर्ण श्रेय पालकमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टी आणि निर्णायक भूमिकेला असल्याचे सांगत ग्रामस्थांनी त्यांचे विशेष आभार मानले. “हा केवळ एका रस्त्याचा विजय नाही, तर ३५ वर्षांपासून दाबल्या गेलेल्या आमच्या आवाजाला मिळालेला न्याय आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आता हा रस्ता लवकरच डांबरीकरण होऊन पक्का होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे. लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेमुळे एक दीर्घकाळ चाललेला लढा यशस्वी झाल्याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.



