चिपळूण,दि.२०: चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथील ग्रामपंचायत सदस्या सौ. वृषाली राजेश कदम यांच्या घराला गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या घराजवळील अंगणाचा काही भाग, व संरक्षक भिंत खचली असून भूस्खलन झाल्याने तेथे राहणे धोकादायक बनले आहे. कदम कुटुंबीयांनी शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मिरजोळी गावचे सरपंच कासमभाई दलवाई यांनी तातडीने कदम कुटुंबीयांच्या घराला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून, शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाला याची माहिती कळवून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नैसर्गिक आपत्तीमध्ये धोकादायक ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.






