सैनिकांना दिलेला शब्द पाळला : माजी सैनिक कुटुंबीयांनी मानले आभार
सावंतवाडी,दि.२४: तालुक्यातील शिरशिंगे ग्रामपंचायत हद्दीत माजी सैनिकांसाठी बांधण्यात आलेल्या “सैनिक भवनाच्या” प्रसाधनगृहासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी २६ जानेवारी २०२५ रोजी या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी प्रसाधन गृहासाठी आर्थिक मदत करण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्ण करत प्रसाधनगृहासाठी लागणारा आर्थिक खर्च गावचे सरपंच दीपक राऊळ यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
याबद्दल बोलताना संजू परब म्हणाले, “आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी काहीतरी करणे हे आपले कर्तव्य आहे. आणि मला आनंद आहे की या मदतीमुळे त्यांना चांगल्या सुविधा मिळतील.”
संजू परब यांच्या या कृतीमुळे स्थानिक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. सैनिक भवन समितीनेही श्री परब यांच्या प्रति आभार व्यक्त केले आहेत.



