विशाल परब यांचा जिल्ह्यात युवा मोर्चातर्फे करण्यात येणार भव्यदिव्य स्वागत व सत्कार..
सिंधुदुर्ग,दि.२२: जिल्ह्याचे युवा नेते विशाल परब यांच्या कामाची दखल घेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने त्यांच्यावर युवा मोर्चा मजबूत करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनानुसार भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राहुल लोणीकर यांनी आज कोल्हापूर येथील दौऱ्यात युवानेते विशाल परब यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित केली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर करत प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी विशाल परब यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हंटले आहे की उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडताना भारतीय जनता पक्षाला ताकद मिळवून देण्यासाठी पक्षाच्या ध्येय धोरणाचा विचार, पार्टीचे काम तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम नक्कीच यशस्वीपणे कराल. गेल्या काही वर्षात विविध भव्य समाजोपयोगी कार्यक्रम, जनहिताचे उपक्रम, प्रचंड जनसंपर्क यातून समाजात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवलेल्या या युवा नेतृत्वाचा पक्षाने राज्यस्तरीय सन्मान केल्याने समाजाच्या सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट असून लवकरच विशाल परब यांचे जिल्ह्यात भव्यदिव्य स्वागत व सत्कार युवा मोर्चातर्फे करण्यात येणार आहे.