Home News चराठे येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी सुरू

चराठे येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी सुरू

0
1

भूजलपातळी वाढवण्यासाठी वनविभाग व ग्रामपंचायतीचा पुढाकार; ‘पालकमित्र’ एसीएफ डॉ. सुनील लाड यांचे मार्गदर्शन

सावंतवाडी,दि.०६: पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजलपातळी वाढवणे आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने चराठे येथे ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्याच्या कामास उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. ‘लोकसहभागातून जलसंधारण, जलसंधारणातून समृद्ध गाव’ या संकल्पनेला प्रत्यक्षात आणत ग्रामस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार गावपातळीवर राबविण्यात येणाऱ्या वनराई बंधारे व कच्च्या बंधाऱ्यांच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची ‘पालकमित्र’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर चराठे गावाचे पालकमित्र म्हणून वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामाची पाहणी केली आणि उपस्थितांना तांत्रिक मार्गदर्शन केले. अशा प्रकारच्या बंधाऱ्यांमुळे परिसरातील विहिरी आणि विंधन विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मोठी मदत होणार असून शेतीसाठीही पाण्याची उपलब्धता सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी गावच्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, वनरक्षक सुशांत चोथे, अक्षय कुंभार, इतर वनकर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सामूहिक श्रमातून आकारास येत असलेला हा वनराई बंधारा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणार असून चराठे गावाचा हा उपक्रम जिल्ह्यातील इतर गावांसाठीही दिशादर्शक व प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here