सिंधुदुर्ग,दि.०८ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातील निवृत्त माहिती उपसंचालक श्री विश्वासराव दुधे यांचे ७ ऑगस्ट रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे.
छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यात राज्य शासनाचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून १९५८ मध्ये त्यांनी शासकीय सेवेला प्रारंभ करून कोकण विभागाचे उपसंचालक म्हणून ते शासकीय सेवेतून निवृत्त झाले. कोल्हापूर रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी शासन आणि पत्रकार यांच्याशी उत्तम दुवा साधून यशस्वी जनसंपर्क अधिकारी म्हणून नावलौकिक संपादन केला. कोल्हापूर आणि रत्नागिरी येथे त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री स्वर्गीय एस एन देसाई यांच्या आदेशानुसार १९८१ मध्ये नवनिर्मित सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पहिले जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम करण्याचा मान त्यांनी मिळविला.
कोकणातील वृत्तपत्रसृष्टीवर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांनी नवोदित पत्रकारांना प्रोत्साहन देऊन पत्रकारिता क्षेत्रात वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. सन २०१२ मध्ये दुधे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रसिद्ध केलेल्या स्मरणिकेेत पश्चिम महाराष्ट्राबरोबरच कोकणातील अनेक पत्रकारानी त्यांच्या उत्कृष्ट जनसंपर्क कार्याचा गौरव करणारे लेख लिहिले होते.