तालुक्यातील वीज समस्येबाबत केली चर्चा..
सावंतवाडी,दि.०५: येथील वीज वितरणचे नवनियुक्त उपअभियंता श्री चव्हाण यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत स्वागत केले तालुक्यातील विजे संदर्भात उद्भवणाऱ्या समस्याबाबत चर्चा केली. पहिल्याच पावसात वीज पुरवठायचा बोजवारा उडाला आहे त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा वापरून ग्रामीण भागातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी केली.
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भाग वीज वितरण कंपनीच्या वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या समस्यांमुळे वैतागला आहे. तालुक्यातील आरोस, पाडलोस सहित आजूबाजूच्या गावांमध्ये होत असलेल्या विजेच्या समस्यांबाबत चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले. कंपनीकडे अपुरा वायरमन स्टाफ असून ग्रामीण भागाकडे अधिकाऱ्यांचा होत असलेला दुर्लक्ष उघड होत आहे. याप्रश्नी लोकांनी विजेच्या समस्या विषयी अधिकाऱ्यांना संपर्क साधले असता त्यांना उडवा उडवीची उत्तर दिली जातात. अशा काही तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या आहेत हे सर्व प्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत तसेच ग्रामीण भागात महावितरणच्या सेवेत सुधारणा करण्यात यावी. वारंवार पावसाच्या दिवसात होत असलेला विजेचा खेळ खंडोबा सुरु असून आता चतुर्थी सणाला अवघा महिना उरला आहे मूर्तीकरांचेही कामही जोरात सुरू आहे. ग्रामीण भागात विजेच्या सततच्या लपंडावंमुळे मूर्तिकारांच्या कामात अडथळे येत आहेत. तर शहरासहित ग्रामीण भागात आपण लक्ष देण्यात यावा व अशा विविध समस्यांबाबत श्री चव्हाण यांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले यावर उप अभियंता चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व आपण स्वतः या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन सेवा सुधारण्याचे पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे श्री चव्हाण यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले.
यावेळी माजी शहर अध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार कार्यअध्यक्ष संतोष भैरवकर नंदू परब म.न.वि.से शहराध्यक्ष निलेश देसाई उप तालुकाअध्यक्ष प्रणित तळकर प्रमोद तावडे विशाल बर्डे, उत्तम घोगळे तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते.