राष्ट्रीय महामार्गातील त्रुटींबाबत मनसेने दिलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हायवे अधिकाऱ्यांची मनसे पदाधिकाऱ्यांशी समन्वय चर्चा

0
98

प्रशासनाच्या विनंती नंतर मनसेचे नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगित..

सिंधुदुर्ग,दि.०८: जिल्ह्यामध्ये खारेपाटण ते बांदा यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमधील असणाऱ्या त्रुटींकडे मनसेने लक्ष वेधत मनसेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर हायवे प्रशासन खडबडून जागे होऊन शुक्रवारी आरटीओ कार्यालयात समन्वय बैठक आयोजित केली होती. या बैठकीस जिल्ह्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नंदकिशोर काळे, महामार्ग विभागाचे उप अभियंता खारेपाटण श्री शिवनिवार, प्रभारी उपअभियंता सावंतवाडी श्री साळुंखे, जिल्हा वाहतूक विभागाचे प्रतिनिधी श्री जाधव व कंत्राटदार प्रतिनिधी समर सिंग व बहूसंख्य मनसे पदाधिकारी उपस्थित होते.मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी हायवेवर वारंवार होणाऱ्या प्राणांतिक अपघातांबाबत जाब विचारत रोड सेफ्टीच्या मार्गदर्शक सूचना अंमलात का येत नाहीत, महामार्गाची वाहन वेग मर्यादा दर्शवणारे स्पीड लिमिट बोर्ड का लावले नाहीत,धोकादायक वळणांवर कॅट आईस रिफ्लेक्टर का बसवले नाहीत,संपूर्ण महामार्गावर रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवा हेल्पलाईन संपर्क फलक का लावले गेले नाहीत आदी प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फोडला तर प्रसाद गावडे यांनी अस्तित्वातील अनधिकृत मिडलकट मुळे होणारे संभाव्य धोके, पावसाळी पाणी ड्रेनेज मधील अडथळे, काँक्रीट व डांबरी मार्गाला जोडणारा उचसखल भाग व त्यातून झालेले अपघात,हायवे प्रवासी शेड दुरावस्था व पिठढवळ पुलानजीकच्या बेकायदा बांधकामामुळे झालेले अपघात आदींबाबत जाब विचारला. महामार्गावरील बहुतांश फलक फलकांवर धुळीचे साम्राज्य झाल्याने रात्रीच्या काळोखात ते दिसत नसल्याचा अनुभव स्वतः आरटीओ काळेंनी बैठकीत समोर मांडला. मनसे पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेची धास्ती घेऊन हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी गणेशचतुर्थी पूर्वी ८० किलोमीटर वेग मर्यादेचे फलक खारेपाटण ते बांदा यादरम्यान लावण्यात येतील,धोकादायक वळणे व अपघात प्रवण क्षेत्रात रिफ्लेक्टर बसवण्यात येतील, संपूर्ण हायवेवर रुग्णवाहिका वा इतर अत्यावश्यक सेवेसाठीचे हेल्पलाइन फलक लावले जातील, पावसाळी पाणी योग्य पद्धतीने निचरा होण्यासाठी ड्रेनेज यंत्रणेची साफ सफाई केली जाईल असा शब्द देत पुढील ४ ते ५ दिवसांत कार्यवाहीची ग्वाही देत सणासुदीच्या काळात आंदोलन न करण्याच्या प्रशासनाच्या विनंतीवर मनसेने नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे जाहीर केले. सणासुदीच्या कालावधीत चाकरमान्यांची लूटमार करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर नियंत्रण ठेवा अन्यथा महाराष्ट्र सैनिक आपल्या परीने कायदा हातात घेईल असा सूचक इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी आरटीओ प्रशासनाला देताच ट्रॅव्हल्स बुकिंग कार्यालयांना लेखी स्वरूपात सक्त ताकीद दिल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी विनोद सांडव,बाबल गावडे, आशिष सुभेदार, प्रतीक कुबल,दिपक गावडे,संदीप लाड,राजेश टंगसाळी,मंदार नाईक,वैभव धुरी,नंदू परब निलेश देसाई संदेश सावंत ज्ञानेश्वर नाईक स्वप्निल जाधव विजय जांभळे यासंह बहुसंख्य मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here