सावंतवाडी, दि.०७: देशाचे लोकनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी निवृत्तीबाबतच्या निर्णयाचा पुनर्विचार करत कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर करत घेतलेल्या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडीच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाके फोडत सर्वांना पेढे वाटण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी “देशाचा बुलंद आवाज…शरद पवार..शरद पवार” , “पवार साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” , “देश का नेता कैसा हो पवार साहेब जैसा हो” अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे म्हणाल्या की ,
“गेली सहा दशके देशाच्या, राज्याच्या राजकारणातील ‘शरद पवार’ हे नाव कुणालाही, कुठेही थांबवता आलेलं नाही. देशाच्या कृषी, कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण, संस्कृतीक व औद्योगिक क्षेत्रात आदरणीय पवारसाहेबांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. या सर्व क्षेत्रांमध्ये पवारसाहेबांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले निर्णय आजही ‘आदर्शवत’ असे आहेत.आदरणीय पवार साहेब हे केवळ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नसून ते आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान व ऊर्जास्त्रोत आहेत. परिवर्तनाच्या या लढाईत पवार साहेबांचे सोबत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे”.
“साहेबांच्या या निर्णयाचे स्वागत करत पुन्हा एकदा नव्या जोमाने साहेबांचे हात बळकट करण्यासाठी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता म्हणून जोमाने काम करूयात”, असा संकल्प यावेळी करण्यात आला.
यावेळी कोकण विभागीय महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अर्चना घारे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री. पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष श्री. योगेश कुबल, सावंतवाडी शहराध्यक्ष श्री. देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्ष सौ. सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, तालुका चिटणीस श्री. काशिनाथ दुभाषी, अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव आसिफ ख्वाजा, शहर चिटणीस श्री. राकेश नेवगी, पक्ष निरीक्षक महिला रत्नागिरी जिल्हा सौ. दर्शना बाबर-देसाई, ग्रामपंचायत सदस्य चराटे सौ. गौरी गावडे, उद्योगपार तालुका उपाध्यक्ष याकुब शेख, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, सौ. मारिता फर्नांडिस, सौ. पूजा दळवी, रामदास गवस, शेखर परब, राकेश गायकवाड, आदी उपस्थित होते.