सावंतवाडी,दि. १२ : सांगेली घोलेवाडी येथील रहिवासी चंद्रकांत बाबाजी राऊळ (वय अंदाजे ६५-७०) यांचा काल शनिवार (दि. ११) कलंबिस्त बाजाराहून परतत असताना घोलेवाडी येथील पुलावरून पाय घसरून पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आज रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह गिरीजनाथ मंदिरामागील नदीपात्रात आढळून आला. या घटनेमुळे राऊळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत राऊळ हे शनिवारी, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कलंबिस्त येथे आठवडा बाजारासाठी गेले होते. बाजार करून घरी परत येत असताना घोलेवाडी येथील पुलावर ही दुर्दैवी घटना घडली. हा पूल अत्यंत कमी उंचीचा असल्याने, थोड्याशा पावसानेही पाण्याखाली जातो. काल झालेल्या पावसामुळे पुलावरून पाणी वाहत होते. या पाण्यातून रस्ता ओलांडताना श्री. राऊळ यांचा पाय घसरला आणि तोल जाऊन ते पाण्याच्या प्रवाहात पडले व वाहून गेले.
रात्री उशिरापर्यंत श्री. राऊळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली, परंतु अंधारामुळे त्यांना यश आले नाही. आज, रविवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केले असता, त्यांचा मृतदेह गिरीजनाथ मंदिराच्या मागील बाजूस नदीच्या पाण्यात आढळून आला.
या घटनेमुळे संपूर्ण सांगेली गावावर शोककळा पसरली आहे. श्री. राऊळ यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. “प्रशासनाने या पुलाची उंची वाढवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा आणखी किती बळी घेणार?” असा संतप्त सवाल उपस्थित ग्रामस्थ करत आहेत. पावसाळ्यात वारंवार पाण्याखाली जाणाऱ्या या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. आतातरी प्रशासन जागे होऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



