सिंधुदुर्ग,दि.१९: पाऊस आला म्हणजे निसर्गाला नवी पालवीच येते. आकाशातील ढगांची गर्दी, गडकिल्ले, डोंगररांगा यांचे हिरवेगार रूप, ओथंबून वाहणारे धबधबे, गारवा देणारा वारा असे अल्हादायक वातावरण मन प्रसन्न करते. अशा या ऋतूमध्ये गडकिलल्यांचे ट्रेकिंग करणे ही खरोखरच एक अद्भुत अनुभूती आहे.
पावसाळ्यात डोंगरदऱ्या, किल्ले, टेकड्या यांना हिरवळ चढते. रस्त्यांवर, पायवाटांवर पावसाचे पाणी खळखळून वाहत असते. झाडांवर ओलसर गारवा जाणवत असतो. त्यामुळे अशा निसर्गसंपन्न ठिकाणी ट्रेकिंग करणे मनाला आल्हाददायक ठरते.
*पावसाळ्यातील ट्रेकिंगचे अनेक फायदे आहेत.*
पावसाळ्यात डोंगरदऱ्या, गड-किल्ले, जंगलं यांना एक वेगळीच टवटवीत हिरवळ प्राप्त होते. त्यामुळे मनाला ताजेतवाणेपणा व आनंद मिळतो. त्यामुळे निसर्गाच्या सान्नीध्यात वेळ घालवता येतो
मानसिक स्वास्थ्यात सुधारणा:
निसर्गात चालणे, पक्ष्यांचा आवाज ऐकणे, पाण्याचे झरे पाहणे यामुळे तणाव कमी होतो, चिंता दूर होते आणि मन प्रसन्न होते. त्यामुळे मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होते.
पावसाळ्यातील चिखलट वाटा, पाणथळ रस्ते यामुळे चालताना शरीराचा अधिक वापर होतो. त्यामुळे पाय, पाठीचा कणा, फुफ्फुसे, हृदय यांचे उत्तम व्यायाम होते.
पावसाळी हवामानात वाटा ओलसर, थोड्याशा कठीण होतात. त्यामुळे अडचणींना तोंड देण्याची सवय लागते आणि धैर्य, आत्मविश्वास वाढतो.
पावसाळ्यात वातावरण स्वच्छ व धुळीविरहित असते. त्यामुळे शुद्ध हवा मिळते, जी फुप्फुसांसाठी चांगली असते. श्वसनाच्या आरोग्यासाठी हे लाभदायक ठरते.
पावसाळी निसर्गात फुलणारी फुले, झरे, धबधबे, छोटे सरपटणारे प्राणी, विविध प्रकारची कीडे, पक्षी यांचे निरीक्षण करता येते. यामुळे फोटोग्राफी व निरीक्षण कौशल्य वाढते.
ग्रुप ट्रेकिंग करताना नवीन ओळखी होतात, जुने मित्र भेटतात, टीमवर्क आणि मदतीची भावना वाढीस लागते.
शहरातील गोंगाट, कामाचा ताण, मोबाइल-स्क्रीनपासून दूर राहून मानसिक विश्रांती मिळते. रोजच्या धकाधकीपासून विरंगुळा मिळतो.
*पावसाळी ट्रेकिंग करताना काही काळजी घेणे खूप गरजेचे आहे.*
पावसाळ्यात योग्य कपड्यांची निवड करणे गरजेचे आहे. पावसात लवकर सुकणारे (Dry-fit) कपडे वापरा. शक्यतो पाण्यापासून वाचवणारा जॅकेट घालावेत.
घसरण टाळण्यासाठी मजबूत ग्रीप असलेले ट्रेकिंग शूज वापरावेत.
मोबाईल, कॅमेरा, पॉवर बँक यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ पाउच वापरावेत तसेच गरज असल्यास प्लास्टिक झिप लॉक बॅग वापरावी.
पुरेसे पिण्याचे पाणी, हलकी स्नॅक्स, ऊर्जादायी खाण्याचे पदार्थ सोबत ठेवावेत. थकवा, डिहायड्रेशन याचा त्रास होऊ नये यासाठी मधूनमधून विश्रांती घ्यावीत.
पावसाळ्यात ओले दगड, माती, गवत यावर पाय घसरू शकतो. त्यामुळे या घसरणीपासून सावध राहणे गरजेचे आहे. जास्त उतार असलेल्या ठिकाणी आधार घ्यावा. त्यासाठी दोरखंड किंवा ट्रेकिंग पोल वापरता आला तर उत्तम.
पावसाळ्यात झाडांखाली, मोठ्या दगडांच्या फटीत साप, विंचू असे प्राणी असण्याची शक्यता असल्याने अशा ठिकाणी जास्त वेळ थांबू नका. जंगलातील काही विषारी झाडांना तसेच फुलांना हात लावू नका.
पावसाळ्यात काही ठिकाणी लेच्यांचा वावर असतो या लेच्यांपासून वाचण्यासाठी लेच प्रोटेक्शन सॉक्स किंवा सोबत मीठ ठेवावे.
हवामानाचा अंदाज घेऊनच ट्रेकिंग ला जावे. जोरदार पाऊस, विजेचा धोका असताना ट्रेक शक्यतो टाळावा. हवामानाची अचूक माहिती घेऊनच ट्रेकला निघावे.
अनोळखी ठिकाणी अनुभवी गाइड किंवा ट्रेक लीडर सोबत जाणे गरजेचे असते. GPS, नकाशा किंवा compass बरोबर ठेवावा. ट्रेकच्या ठिकाणी नवी वाट न वापरता ठरलेला रस्ताच वापरवा.
ट्रेकच्यावेळी प्रथमोपचार किट जवळ ठेवावे. बँडेज, डेटॉल, पेनकिलर, लेच/कीटकदंशासाठी औषधं सोबत असावीत.
ट्रेक ला गेलेल्या ठिकाणी कचरा करू नका. प्लास्टिक सारखा कचरा न सोडता परत घेऊन या. निसर्ग स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे.
आपल्या शारीरिक क्षमतेनुसारच आपला ट्रेक निवडावा. आपली ताकद, सहनशक्ती आणि अनुभव यानुसार ट्रेकची निवड करा.
तलाव, धबधबा, ओढे यामध्ये अचानक पाण्याची पातळी वाढण्याचा धोका असतो, त्यामुळे त्यात उतरताना जास्त काळजी घ्यावी.
महत्वाचे म्हणजे असुरक्षित ठिकाणी सेल्फी, फोटो व व्हिडीओ काढणे टाळावे. परिसरातील रेस्क्यू टीमचे संपर्क क्रमांक आपल्या सोबत ठेवावेत जेणेकरून अडचणीच्या काळात आपल्याला संपर्क करणे सोपे जाईल.
वरील सर्व काळजी घेतल्यास आपल्याला पावसाळ्यातील ट्रेकिंगचा आनंद मनमुराद घेता येईल. पावसाळी ट्रेकिंगला जाताना सोबत सीड बॉल, बिया किंवा एखादे रोप नेता आले तर नक्की न्या. ज्या ठिकाणी जाणार त्या जंगलात या बिया टाका, त्यामुळे ट्रेकिंग बरोबर एखादे झाड लावून पर्यावरणाचे संवर्धन ही आपल्याला साधता येईल. मग जाताय ना या पावसाळ्यात एखाद्या ट्रेकला..!