सिंधुदुर्ग,दि.०१: दिवाळी आली की शाळेला किमान दोन आठवडे तरी सुट्टी असते, या सुट्टीमध्ये मुलांचा आकाशकंदील, ग्रीटिंग्स बनवणे, एखाद्या छंद वर्गात जाणे तसेच सुट्टीमध्ये नातेवाईकांकडे जाणे यातच त्यांचा वेळ निघून जातो. महाराष्ट्रात अनेक दशकांपासून मातीचे किल्ले बनविणे लोकप्रिय आहे. परंतु सिंधुदुर्गातील मुले दिवाळी सुट्टी आली की मातीचे किल्ले बनवतात हे फक्त पुस्तकातच वाचत असतो. कोकणात मातीचे किल्ले बनवणे हे काही तालुक्याच्या ठिकाणीच आपल्याला दिसून येते. मातीचे किल्ले बनविण्याचे फायदे लक्षात घेता आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकांनी आपल्या मुलांना दिवाळीत मातीचे किल्ले बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीमध्ये साल्हेर ते तामिळनाडू मधील जिंजीपर्यंत असंख्य किल्ले जोडले गेले तसेच बांधले गेले. त्यात जमिनीवर बांधलेले कोट, गढी, पाण्यात बांधलेले जलदुर्ग, डोंगरमाथ्यावर बांधलेले गिरीदुर्ग, वनदुर्ग असे अनेक प्रकारचे गड-किल्ले आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक किल्याच्या मागे इतिहास आहे. मुलांना किल्ल्यांच्या इतिहासाची माहिती शाळेत पूर्ण मिळतेच असे नाही. परंतु त्यांना या किल्ला बनविण्याच्या प्रक्रियेतून आपल्या समृद्ध वारशाबद्दल खूप काही शिकायला मिळते. किल्ल्यासंबंधी किल्याचा प्रकार, उंची, इतिहास, बांधकाम, तटबंदी, माची, खंदक, दरवाजा प्रकार, बुरुज, तलाव, किल्यावरील इमारती याबाबत आपसूक मुलांना माहिती होते.
इयत्ता सातवीतील आदर्श राज्यकर्ता या पाठातील एक क्षमता विधान आहे की, किल्ल्याच्या प्रमाणबद्ध प्रतिकृत्या तयार करतात. यावरून इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना देखील किल्ल्याची प्रमाणबद्ध प्रतिकृती बनविणे आवश्यक आहे. या वर्षी शिक्षक विशाल धुरी यांच्या शाळेमध्ये उपलब्ध जागेत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती बघून खूप आनंद झाला. माझ्याही शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रुप करून दिवाळीत किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे अशी माहिती शिक्षक गणेश नाईक यांनी दिली.
गेल्या तीन वर्षांमध्ये कुडाळ मध्ये गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा भरविली जाते त्यातून किल्ले बनवणाऱ्यांना खूप प्रोत्साहन मिळते. गेली दोन वर्षे मी आणि माझे मित्र समिल नाईक या स्पर्धेचे परीक्षण करत आहोत. त्यावेळी लक्षात येते की, काहीजण या किल्ल्यामध्ये आपला जीव ओतून काम करतात. गडाचा इतिहास, गडावरील ठिकाणे यांचा खूप सखोल अभ्यासकरून सदर किल्ले प्रतिकृती बनवतात. गेल्यावर्षी एका मंडळाने दोन ते अडीज डम्पर माती आणून हुबेहूब जिंजी किल्ला बनवलेला होता. शहरांत याप्रकारच्या स्पर्धा आयोजित होतात परंतु ग्रामीण भागात अशाप्रकारच्या स्पर्धा तेथील स्थानिक मंडळानी आयोजित करून मुलांना किल्ले बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. गेल्यावर्षी माणगावमध्येही एका पक्षामार्फत स्पर्धा आयोजित केलेली होती याचेही परीक्षण करण्याची संधी मिळाली. महादेवाचे केरवडे गावातील काही मुलांनी एकत्र येऊन मातीचा किल्ला बनवलेला ते बघून खरंच त्यांचे खूप कौतुक वाटलं.
शहरामध्ये आता जरी फ्लॅट संस्कृती असली तरी मुलं आपल्या घराच्या कोपऱ्यात, गॅलरीत किल्ला हा बनवतात. माती, शेण, दगड, सिमेंट, प्लास्टिक कागद, गोणपाट, शाडू माती, पुठ्ठा, गवत, रंग अशा विविध साहित्याचा वापर करून किल्ला बनवला जातो. किल्याच्या विविध भागात डोंगर, रस्ते, तटबंदी, बुरुज, खंदक, तलाव, राजवाडा इतर इमारती, घरे दाखवली जातात. बांधणी झाल्यावर किल्ल्यावर ध्वज लावतात. काही किल्यांमध्ये पूल बांधला जातो. महाराजांसाठी सिंहासन, महाराजांच्या, मावळ्यांच्या मुर्त्या इत्यादीही ठेवल्या जतात. इतर सर्वांसाठी मातीचे किल्ले बनविणे शुल्लक खेळकर प्रकार वाटतं असला तरी हे एक जीवनाचे मुख्य धडे देणारे एक सार्थक मिशनच आहे. मातीच्या किल्यातून मुले खालील गोष्टी शिकतात :
इतिहास : मुले विविध प्रकारचे किल्ले बनवतात त्यावरून विद्यार्थ्यांना किल्ल्याच्या प्रकारा बरोबरच किल्यावर घडलेल्या घडामोडी, इतिहास, किल्ल्याशी निगडित कथा शिकतात. इतिहास शिकवण्यासाठी, आपला समृद्ध वारसा मुलांमध्ये जागृत करण्यासाठी याहून चांगला मार्ग नाही.
संघभावना : मातीचा किल्ला बांधण्यासाठी कमी मनुष्यबळ व कौशल्य लागते असे नाही. किल्ला बांधताना कराव्याच्या कामांची वाटणी करणे. प्रत्येकाला दिलेली कामे वेळेत पूर्ण करणे यामुळे संघभावना विकसित होते. इतरांना प्रोत्साहन द्यायला मुले शिकतात. आलेल्या समस्यांवर उपाय शोधायला शिकतात.
अभियांत्रिकी : किल्ला बांधताना विविध वास्तुशास्त्रीय बाबींचा विचार करणे गरजेचे असते. किल्ला बनवायच्या जागेची निश्चित्ती, मातीचा दर्जा, साहित्याचे मिश्रण, बुरुज, पुलांची मजबुती व स्थिरता अशा विविध बाबींमध्ये मुले स्वतःच्या चुकूनमधून शिकतात.
सुरक्षेचे उपाय : इतिहासात किल्ल्याचे मुख्य उदिष्ट हे संरक्षणच होते. इतिहासात अनेक राज्ये शत्रूच्या हाती गेली आणि किल्ले जप्त झाले. किल्ले बांधणीमुळे लहान वयातच मुलांना युद्धाचे आणि सुरक्षिततेचे नियम शिकता येतात. सुरक्षिततेसाठी त्याकाळी किल्यामध्ये केलेल्या उपाययोजना यांची माहिती मुलांना होते.
आता मोबाईल व संगणक गेमच्या काळात मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी बाहेर प्रयत्नपूर्वक बाहेर काढावे लागते. अशावेळी मातीचे किल्ला बनविण्याच्या अर्थपूर्ण कार्यात मुलांना गुंतवून ठेवण्याचे एक उत्कृष्ट साधन आहे. विविध सामाजिक संस्था, स्थानिक मंडळे यांनी मातीचे किल्ले बनविण्याच्या उपक्रमासाठी पाठपुरावा व प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे.
या गडकिल्ल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला उजळा मिळत आहे. असेही यावेळी शिवभक्त गणेश नाईक यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.