सावंतवाडी,दि.१८: दीप अमावस्या… दीप म्हणजे दिवा. भारतीय संस्कृती प्रमाणे दिवे लावून दिव्यांची पूजा करणे, हा या सणाचा उद्देश परंतु अलीकडे या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून संबोधले जाते आणि जीवाची मजा केली जाते. आपल्या समाजामध्ये आपल्या सणांचे कसे विद्रूपीकरण केले जाते. या संदर्भातील माहिती आजच्या पिढीला झाली पाहिजे या अनुषंगाने आपल्या जीवनात दिव्यांचे महत्त्व किती आहे? याची माहिती वर्गशिक्षक श्री वरक सर यांनी माहिती दिली. सोबतच दिवे कोणकोणते प्रकारचे असतात, लाईट नसताना पूर्वीच्या काळामध्ये कोणत्या दिव्याच्या आधारे जनजीवन चालायचे? याची विस्तृत माहिती मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत यांनी दिली. सोबतच दिव्या विषयीचे दीपज्योती नमोस्तुते हे गीत शिक्षिका श्रीमती जे. एम. गुंजाळ यांनी मुलांना शिकवले. दीप अमावस्येचे महत्त्व आताच्या मुलांना समजावे, आणि तो संस्कार त्यांच्या मनामध्ये रुजावा, यासाठी कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता चौथीच्या मुलांसाठी विविध दिव्यांची ओळख हा वैविध्यपूर्ण उपक्रम वर्गामध्ये घेतला. मुलांनी आपल्या घरातून विविध दिवे यावेळी शाळेमध्ये आणले. त्यात रॉकेलचे दिवे, तेलावर चालणारे दिवे, लाईट वर चालणारे दिवे असे अनेक प्रकार यात समाविष्ट होते. त्याचप्रमाणे गॅस बत्ती, कंदील, प्लास्टिक दिवा, चांदीचा दिवा, पितळेचा दिवा, रॉकेल चा दिवा,दगडी पणत्या, मातीच्या पणत्या, विशिष्ट आकारातल्या पणत्या असे अनेक प्रकारचे दिवे आणून त्यांची पूजा केली. व हा सण साजरा केला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप सावंत वर्गशिक्षक श्री डी. जी. वरक, श्रीमती घाडीगावकर त्याचप्रमाणे शाळेचे शिक्षक श्री अमित कांबळे, ज्योत्स्ना गुंजाळ, प्राची बिले, स्वरा राऊळ श्रीमती संजना आडेलकर व विद्यार्थी उपस्थित होते.