दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाच्या श्रम संस्कार शिबिरात मार्गदर्शन
दोडामार्ग,दि.२७: बदलत्या जीवनशैलीमुळे आज अनेक आरोग्य समस्या उभ्या ठाकत आहेत. मात्र, सिंधुदुर्गसारख्या निसर्गसंपन्न भागात आपली पारंपरिक संस्कृती आणि सकस आहार पद्धती जतन केल्यास, आपण या समस्यांपासून दूर राहू शकतो, असे प्रतिपादन ‘व्हाइस ऑफ मीडिया’चे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष तथा सिंधुदुर्ग न्यूजचे संपादक भूषण सावंत यांनी केले.
लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालय, दोडामार्ग आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) श्रम संस्कार शिबिराच्या बौद्धिक सत्रात “बदलती जीवनशैली व आरोग्य” या विषयावर ते बोलत होते. भिकेकोनाळ येथे पार पडलेल्या या सत्राच्या अध्यक्षस्थानी भूषण सावंत होते. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हा रुग्णालय दोडामार्गचे डॉ. रामदास रेडकर, ग्रामस्थ श्री. गवस आणि प्राध्यापक संजय खडपकर उपस्थित होते.
स्थानिक आहार हेच आरोग्याचे सूत्र आपल्या अध्यक्षीय भाषणात भूषण सावंत पुढे म्हणाले की, कोकणातील हवामान आणि मातीत जे धान्य, भाजीपाला व फळे पिकतात, ती मानवी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत. ज्या भागात जे पिकते, त्याचाच आहारात समावेश केल्यास शरीरावर विपरीत परिणाम होत नाहीत. “बदलत्या काळात तंत्रज्ञान स्वीकारले तरी सकस आहार, वेळेवर झोप आणि स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.
मोबाईलचा अतिवापर टाळा: डॉ. रेडकर यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. रामदास रेडकर यांनी आधुनिक जीवनशैलीतील धोक्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, सध्या मोबाईलचा अतिवापर ही मोठी समस्या बनली असून, त्याचे नकारात्मक परिणाम लहान मुलांवर व कौटुंबिक स्वास्थ्यावर होत आहेत. गरज असेल तितकाच मोबाईल वापरावा. तसेच, आपण पूर्णपणे सुदृढ आहोत असा गैरसमज न बाळगता वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या, नियमित व्यायाम आणि योगासने यांचा दैनंदिन जीवनात समावेश करावा, असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या बौद्धिक सत्राला एनएसएसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बदलत्या काळात आरोग्य कसे जपावे, याचे सखोल मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक जागृती निर्माण झाली आहे. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयीन स्तरावरून उत्तमरित्या करण्यात आले होते.



