खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणारे दोन तरुण ताब्यात..!

0
113

सावंतवाडी वन विभागाकडून कारवाई..

सावंतवाडी,दि .०८: सावंतवाडी वनपरिक्षेत्राच्या टीम कडून आज दुपारी बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातून दोन आरोपींना खवले मांजराच्या खावल्यांची तस्करी करून व्यवहार करत असताना ताब्यात घेतले.
दरम्यान आरोपींकडून जवळजवळ ०२ किलो वजनाचे खवले मांजराचे खवले व दुचाकी हिरोहोंडा गाडी क्र-GA-09-C 6696 देखील जप्त करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृतांत असा की, सावंतवाडी वन विभागाला आज दुपारी मिळालेल्या गुप्त महितीच्या अनुषंगाने सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक प्रकाश रानगिरे, अप्पासो राठोड यांच्या टीमने आरोपींना पकडण्यासाठी बांदा येथे सापळा रचला. रचलेल्या सापळ्यानुसार आरोपी खवले मांजराच्या खावल्यांच्या विक्रीचा व्यवहार कारण्यासाठी बांदा येथे दुपारच्या दरम्यान आले असता वन विभागाच्या टीमने त्यांच्यावर झडप घालून अलगद ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आरोपी क्र.१- नारायण सावळाराम नाईक, वय-४८ वर्षे, आरोपी क्र.२- सद्गुरू मारुती नाईक, वय-५२ वर्षे अशी आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून अंदाजे ०२ किलो वजनाचे खवले मांजराचे खवले व एक दुचाकी (अंदाजे रक्कम-५० हजार रु.) हस्तगत करण्यात आली. सदरच्या अटक आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम-१९७२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना उद्या सावंतवाडी कोर्टमध्ये हजर केले जाईल. सदरची कारवाई ही सावंतवाडी उपवनसंरक्षक श्री.एस नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक श्री.सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक प्रकाश रानगिरे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

खवले मांजर हा दुर्मिळ प्राणी आपल्या नैसर्गिक परिसंस्थेमध्ये महत्वाची भूमिका बजावतो. मुग्यांची व कीटकांची संख्या नियंत्रित करून नैसर्गिक समतोल अबाधित राखतो. खवले मांजराच्या खावल्यांबाबत समाजात पसरवलेल्या काही गैरसमजामुळे या दुर्मिळ वन्यजीवाची जगभरात मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. सावंतवाडी वन विभागाकडून या दुर्मिळ वन्यजीवाच्या संवर्धनासाठी ‘खवले मांजर वाचवा मोहीम’ राबविली जात असून सर्व सुजाण नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की खवले मांजराच्या शिकारी विषयी आपण बातमी दिल्यास त्याबदल्यात आपला सन्मान करण्यात येऊन इनाम देण्यात येईल.
असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here