Home News माणगाव खोऱ्याचे लाडके व्यक्तिमत्त्व शिवराम उर्फ संदेश केसरकर यांचे निधन; कॅन्सरशी साडेचार...

माणगाव खोऱ्याचे लाडके व्यक्तिमत्त्व शिवराम उर्फ संदेश केसरकर यांचे निधन; कॅन्सरशी साडेचार वर्षांची झुंज अखेर संपली

0
2

संघर्षातून उभा राहिलेला सच्चा माणूस हरपला; अश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप

कुडाळ, दि.०६: माणगाव तिठा येथील हॉटेल प्रथमचे संचालक आणि माणगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शिवराम उर्फ संदेश केसरकर (वय ५४) यांचे आज, शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. संपूर्ण माणगाव खोऱ्यात “संदेश भाई” या नावाने परिचित असलेल्या या मनमिळावू आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

गेली साडेचार वर्षे ते कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी अत्यंत धैर्याने लढा देत होते. २०२२ मध्ये त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतरही असह्य वेदनांचा सामना करत त्यांनी चेहऱ्यावरील हास्य आणि जगण्याची उमेद कधीही ढळू दिली नाही. मात्र, आज पहाटे काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांची ही झुंज कायमची थांबली.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आणि संघर्षातून त्यांनी आपला संसार उभा केला होता. स्वतः गरिबी अनुभवल्याने सामाजिक जाणीव ठेवून ते नेहमीच गरजवंतांच्या मदतीला धावून जात असत. एक कष्टाळू शेतकरी म्हणून माणगाव खोऱ्यात त्यांची विशेष ओळख होती, तर हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी जनमानसात आपुलकीचे घट्ट नाते निर्माण केले होते.

माणगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेल्या संदेश भाईंनी शालेय जीवनात पासिंग व्हॉलीबॉल संघात ‘उत्कृष्ट स्मॅशर’ म्हणून नावलौकिक मिळवला होता. ते माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सभासदही होते. नोव्हेंबर २००३ मध्ये माणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कट्टावाडी प्रभागातून अपक्ष म्हणून विजय मिळवत त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधित्वाची छाप पाडली. आपल्या कार्यकाळात अनेक लोकाभिमुख कामे करतानाच, राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासल्यामुळे त्यांची अजातशत्रू नेता म्हणून ओळख निर्माण झाली होती.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच माणगाव परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने त्यांच्या निवासस्थानी धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. आज सकाळी ११ वाजता माणगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहीण, वहिनी, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार भरत केसरकर यांचे चुलतभाऊ, तर कनेडी येथील हॉटेल व्यावसायिक वल्लभ भोगटे यांचे मेहुणे होत. संदेश भाईंच्या निधनाने माणगाव खोऱ्यातील एक सच्चा मित्र, संवेदनशील लोकप्रतिनिधी आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here